सावईवेरे, केरी, वळवई शाळांमधील प्रकार : शिक्षण खात्याकडून चौकशीचा आदेश
वार्ताहर /सावईवेरे
सावईवेरे, केरी व वळवई पंचायत क्षेत्रातील सरकारी व खासगी शाळांमध्ये पुरविण्यात आलेल्या माध्यान्ह आहारात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिक्षण खात्याकडून या प्रकरणी चौकशीचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुदैवाने एकाही मुलाला त्यापासून बाधा झाल्याचे वृत्त नाही. या प्रकारामुळे माध्यान्ह आहाराच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगेशी येथील उत्कर्ष स्वयंसाहाय्य गटामार्फत सावईवेरे, केरी व वळवईसह प्रियोळ मतदारसंघातील प्राथमिक व माध्यमिक अशा साधारण चाळीस शाळांमधील मुलांना माध्यान्ह आहार पुरविला जातो. मंगळवारी सकाळी 10.30 वा. मधल्या सुट्टीच्यावेळी माध्यान्ह आहारात सोयाबिन घातलेला पुलाव मुलांना पुरविण्यात आला होता.
सर्वप्रथम सावईवेरे येथील शाळेमध्ये सोयाबिनमध्ये मृत अळ्या असल्याचे मुलांच्या निदर्शनास आले. शिक्षकांना हे कळताच त्यांनी मुलांना खाद्यपदार्थ खाण्यापासून थांबवले. मात्र त्यापूर्वी काही मुलांनी हा पुलाव खाल्ला होता. काही वेळाने सावईवेरेतील अन्य शाळा तसेच केरी व वळवई भागातील शाळांमध्येही माध्यान्ह आहारात अळ्या असल्याचे उघडकीस आले. तासाभरानंतर फोंडा भागशिक्षणाधिकाऱ्यांकडे तशा तक्रारी येऊ लागल्याने तेथील अधिकाऱ्यांनी शिक्षण खात्याशी संपर्क साधला. दुपारी अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने शाळांना पुरविण्यात आलेल्या खाद्यपदार्थाचे नमुने गोळा केले. तसेच पुरवठादार उत्कर्ष स्वयंसाहाय्य गटाच्या किचनची तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत एकूण सात शाळांमधून यासंबंधी तक्रारी आल्या आहेत. एफडीए व भागशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान ज्या दुकानातून हे सोयाबिन चंग्स खरेदी केले होते, त्यात अळ्या होत्या व हा प्रकार नंतर लक्षात आला, अशी कबुली या पुरवठादार गटाने दिली आहे.