वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय स्क्वॅश क्षेत्रामध्ये तब्बल दोन दशके भारताचे अव्वल स्क्वॅशपटू सौरभ घोषाल, ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि दिपिका पल्लिकल यांनी अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. आता 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या चीनमधील हेंगझोयूतील आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा हे भारताचे स्क्वॅशपटू दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्क्वॅशपटूंनी आपल्या वयाची तिशी ओलांडली आहे. कदाचित या स्क्वॅशपटूंची ही शेवटची आशियाई स्पर्धा राहिल अशी चर्चा चालू आहे. दिपिका पल्लिकलने गेल्याच आठवड्यात आपला 32 वा वाढदिवस साजरा केला. दिपिकाने या आगामी आशियाई स्पर्धेसाठी आपले प्रवेश पत्रिका दाखल केली असून भारताला पदक मिळवून देण्याची तिची इच्छा अधिक प्रबळ झाली आहे. दीपिका ही दोन मुलांची माता आहे. अलीकडच्या कालावधीत दीपिकाने एकेरीत खेळणे अधिक पसंद केलेले नाही. त्यामुळे ती आता या आगामी आशियाई स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या सुवर्णपदकासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.
सौरभ घोषाल आणि ज्योत्स्ना चिन्नप्पा हे भारतीय स्क्वॅश क्षेत्रातील आघाडीचे स्क्वॅशपटू म्हणून ओळखले जातात. सौरभ आणि ज्योत्स्ना यांनी आपल्या वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. सौरभ आणि ज्योत्स्ना यांनी मात्र एकेरीत खेळणार असून त्यांना भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची कदाचित शेवटची संधी उपलब्ध असेल. 2002 साली आशियाई स्पर्धेमध्ये स्क्वॅश या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर भारताच्या सौरभ घोषालने 2002 च्या आशियाई स्पर्धेत सात पदके तर ज्योत्स्नाने चार पदकांची कमाई केली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दर्जाची तुलना केल्यास आशियाई स्पर्धा ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाएवढी दर्जेदार समजली जात नाही. 2014 साली इंचॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सौरभ घोषालला पुरुष एकेरीतील पदकाला मुकावे लागले होते. घोषालच्या स्मरणार्थ हे दु:ख आजही जाणवते. या स्पर्धेमध्ये भारताच्या स्क्वॅशपटूंनी पहिल्यांदा सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. 2006 सालच्या आशियाई स्पर्धेत घोषालच्या पहिले कास्यपदक मिळवले होते. त्यानंतर त्याने आपले लक्ष आजपर्यंत सुवर्णपदकावर ठेवले आहे. गेल्या झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत घोषालने ऐतिहासिक कायस्पदक मिळवले होते. स्क्वॅशपटूंच्या मानांकनात घोषाल एकेरीत दुसऱ्या स्थानावर असून मलेशियाचा इयेन अग्रस्थानावर आहे. हेंगझोयु स्पर्धेमध्ये घोषालला प्रामुख्याने पाक, कुवेत, हाँगकाँगच्या स्पर्धकांकडून कडवा प्रतिकार राहिल. 2014 च्या आशियाई स्पर्धेत हाँगकाँगच्या अब्दुल्लाने सुवर्णपदक मिळवले होते.
ज्योत्स्ना चिन्नप्पाला अलीकडच्या कालावधीमध्ये वारंवार दुखापतीने दमवले. पण आता तिची प्रकृती पूर्णपणे तंदुरुस्त असून ती या आगामी आशियाई स्पर्धेत पदकासाठी भुकेलेली आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या जकार्ता आशियाई स्पर्धेत ज्योत्स्नाने एकेरीत कास्यपदक मिळवले होते. त्यानंतर तिने सांघिक प्रकारात आणखी तीन पदकांची कमाई केली होती. ज्योत्स्नाला यावेळी या आगामी स्पर्धेत जपानची टॉपसिडेड वटांबे, हाँगकाँगची लॉक हे प्रमुख प्रतिस्पर्धी राहतील. 2018 च्या आशियाई स्पर्धेत सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून देताना ज्योत्स्ना आठवेळा विश्व चॅम्पियन असलेल्या निकोल डेव्हिडला पराभूत केले होते. दीपिका पल्लिकल ही या आगामी आशियाई स्पर्धेत मिश्र दुहेरीत आपला सहभाग दर्शवणार आहे. दीपिकाचा साथीदार संधुक राहिल. दीपिका आणि संधू यांनी तीन महिन्यापूर्वी चेन्नईत झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक मिळवले होते. जकार्ता आशियाई स्पर्धेत स्क्वॅश प्रकारात भारताने एक रौप्य आणि चार कास्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली होती.