विदेशातून भारतीयांचे पार्थिव मायदेशी आणण्यास मदत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विदेशात कुठल्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया आता तुलनेत सोपी ठरणार आहे. याकरता सर्व एअरलाइन्स एजेन्सी ‘ओपन ई-केयर प्लॅटफॉर्म’ सुरू करणार आहेत. या व्यवस्थेमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना केवळ एक अर्ज करावा लागणार आहे. अर्जाला मंजुरी आणि विदेशातून पार्थिव आणण्याची प्रक्रिया जलदगतीने पार पाडली जाणार आहे. यापूर्वी एखाद्या भारतीय नागरिकाचा विदेशात मृत्यू झाल्यास पार्थिव आणण्यासाठी संबंधिताच्या कुटुंबाला दीर्घ प्रक्रियेचे पालन करावे लागत होते. यात कधीकधी एक आठवडा किंवा त्याहून कालावधी लागत होता. मृत्यू संशयास्पद असल्यास हा कालावधी आणखी वाढत होता. अनेकवेळा भारतीय विदेश मंत्रालयाला देखील हस्तक्षेप करावा लागायचा. याचमुळे मागील अनेक दिवसांपासून विदेशातून भारतीय नागरिकांचे पार्थिव आणण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली जात होते. आता या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
ओपन ई केयर
ओपन ई केयर प्लॅटफॉर्मला सर्व एअरलाइन्स कंपन्यांनी मिळून तयार केले आहे. जर एखाद्या भारतीय नागरिकाचा विदेशात मृत्यू झाल्यास पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकरता मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना केवळ एक अर्ज करावा लागणार आहे. आवश्यक दस्तऐवज आणि अर्जाच्या पडताळणीनंतर मृतदेह आणण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडली जाणार आहे. भारतीयांचे पार्थिव मायदेशी आणण्यादरम्यान होत असलेला विलंब टाळण्यासाठी हे पोर्टल सुरू केले जातेय. या पोर्टलद्वारे केंद्रीय आंतरराष्ट्रीय आरोग्य विभाग, नोडल अधिकारी तसेच विमानो•ाण कंपन्यांना ईमेल, एसएमएस आणि व्हॉट्सअॅपद्वारे माहिती मिळेल. नोडल अधिकारी अर्जाची पडताळणी करणार असून 48 तासांच्या आत मंजुरी मिळवून दिली जाईल. अर्जाची स्थिती पोर्टलवर पाहता येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यंमत्री मांडविया यांनी दिली आहे.