अजित पवार इतके मोठे नेते नाहीत की ते शरद पवारांना ऑफर देऊ शकतील असा टोला संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. अजित पवार यांनी पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी काका शरद पवार यांची भेट घेतल्याच्या काही दिवसांनंतर, काँग्रेसने अजित पवार शरद पवारांकडे दोन ऑफर घेऊन आले होते. असा आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यात १२ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका व्यावसायिकाच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर कॉंग्रेससह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी यावर टिका करून प्रतिक्रिया दिली.
कोल्हापूर दौऱ्य़ावर असताना कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार हे शरद पवारांकडे दोन ऑफर घेउन घेल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी शरद पवारांना केंद्रात कृषीमंत्रीपद तसेच निती आगोगाचे अध्यक्षपद यासह त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रीय़ मंत्रीपदाची ऑफर यांचा समावेश असल्याचा आरोप केला.
वडेट्टीवार यांच्या या दाव्यावर बोलताना संजय राउत म्हणाले की, “अजित पवार इतके मोठे नाहीत कि ते शरद पवार यांना अशा प्रकारची ऑफऱ देऊ शकतील. अजित पवार यांनी शरद पवारांना घडवले नाही. शरद पवार यांनी अजित पवार यांना घडवले आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांचे स्थान मोठे आहे. त्यामुळे अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांकडून पवारसाहेबांना ऑफऱ येणे शक्य नाही.” असे मत त्यांनी व्यक्त केले.