वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जागतिक जलद बुद्धिबळ विजेता आणि पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनने भारताच्या धोरणात्मक दृष्टिकोन आणि खेळातील कामगिरी यांची प्रशंसा करताना एक आघाडीचे बुद्धिबळ राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्या भारताच्या क्षमतेविषयी विश्वास व्यक्त केला आहे. कार्लसन हा त्याच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जातो. जागतिक बुद्धिबळ स्तरावरील भारताचे यश आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे नुकतेच केलेले आयोजन हे भारताच्या प्रगतीचे मजबूत संकेत आहेत, असे मत कार्लसनने व्यक्त केले आहे.
मला वाटते की, भारत आतापर्यंत बऱ्याच योग्य गोष्टी करत आला आहे आणि त्याला जगातील आघाडीचे बुद्धिबळ राष्ट्र होण्यास फारसा वेळ लागणार नाही, असे कार्लसनने म्हटले आहे. नॉर्वेचा सदर ग्रँडमास्टर शुभारंभी ग्लोबल चेस लीगच्या आयकॉन खेळाडूंपैकी एक आहे. त्याने बुद्धिबळातील भारताच्या भविष्याबद्दल उत्सुकता दाखविली आहे.
ग्लोबल चेस लीग हा टेक महिंद्रा आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ यांचा संयुक्त उपक्रम असून ही जगातील अशा प्रकारची पहिली आणि सर्वांत मोठी अधिकृत फ्रँचायझी लीग बनणार आहे. यात जगभरातील बुद्धिबळपटू एका अनोख्या सांघिक स्वरूपात स्पर्धा करतील. ही लीग 21 जून ते 2 जुलै या कालावधीत दुबई येथे होणार आहे. या जलद बुद्धिबळ स्वरूपाच्या स्पर्धेत सहा संघ सहभागी होतील आणि दुहेरी साखळी फेरीत प्रत्येकी किमान 10 सामने खेळतील.
कार्लसनने या अभिनव उपक्रमाचा भाग बनल्याबद्दल वाटणारा उत्साह व्यक्त करताना म्हटले आहे की, माझ्यासाठी ही एक रोमांचक संधी आहे. हे काहीतरी नवीन आहे, बुद्धिबळात अशा प्रकारे काही केले गेलेले नाही. भारतीय युवा बुद्धिबळपटूंसमवेत आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासही आपण उत्सुक बनलेलो आहे, असे त्याने म्हटले आहे. साखळी फेरीच्या टप्प्यातील अव्वल दोन संघ 2 जुलै रोजीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. त्यात विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरवला जाईल. या लीगमध्ये पुरुष आणि महिला बुद्धिबळातील विजेते खेळाडू एकत्र येऊन एका संघातून खेळताना दिसतील.