गळतीमुळे लोकांमध्ये वाढली चिंता
विजय पाटील सरवडे
राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथील धरण गळतीच्या माध्यमातून कायम चर्चेत राहिले आहे. या धरणाच्या मुख्य भिंतीतून पाणी पाझरत असल्याने उपाय योजना करण्यासाठी यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत मात्र हा खर्च पाण्यात गेला आहे. सध्या धरणात सतर टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा झाला असून मुख्य भिंतीतून पाण्याची गळती वाढली आहे.गळतीमुळे लोक भीतीच्या छायेखाली वावरत असून धरण गळतीच्या गंभीर समस्येकडे शासन वेळीच लक्ष देणार की दुर्घटना घडल्यावर डोळे उघडणार? असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे.
या धरणाच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने सुरुवातीपासूनच धरणाच्या मुख्य भिंतीला गळती लागली आहे. धरणाची अंतर्गत गॅलरी आणि इतर ठिकाणातूनही गळतीचे प्रमाण वाढत आहे. सध्या मुख्य भिंतीतून प्रती सेकंद 370 लिटर पाण्याची गळती होत असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात ही गळती अधिक आहे. हि अशीच वाढत गेल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. याचे शासन व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्य घेतले पाहिजे. गळतीची उपाय योजना करताना केवळ वरकरणी न करता कायम स्वरूपी गळती थांबेल यादृष्टीने निर्णय घेतला पाहिजे. लोकांच्या समाधानासाठी गळतीवर कोट्यावधी रुपये खर्च करायचे आणि त्यातून गळती थांबणार नसेल तर अशा दिखाऊपणाच्या उपाय योजना न करता लोकांच्या सुरक्षिततेसाठी तज्ञांच्या सल्ल्यातून ठोस उपाययोजना करावी अशा भावना व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून काळमावाडी धरणाची ओळख आहे. कोल्हापूर जिह्य बरोबर कर्नाटक राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय या धरणाची झाली आहे. मात्र वरदायीणी ठरलेल्या या धरणाच्या गळतीकडे शासन आणि जलसंपदा विभागाने गांभीर्याने पहिलेले नाही. यामुळे गळतीचे प्रमाण वाढले आहे. धरणाच्या मुख्य भिंतीबरोबर धरणाची गॅलरी, सांधे यासह धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सध्या या धरणातून प्रती सेकंद370 लिटर गळती होत असल्याचे तज्ञांचे मत असले तरी मुख्य भिंतीतून येणारे पाण्याचे कारंजे बघितले तर गळतीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. हि बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे गळती रोखणे गरजेचे आहे. यापूर्वी या धरणाच्या भिंतीची गळती काढण्यासाठी धरणावरून होल मारून सिमेंट ग्राउटिंग, इफोक्सिंग ग्राउटिंग केल आहे. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र धरणाची आताची गळती बघितली तर गळती काढण्यासाठी केलेला खर्च वाया गेला गेल्याचे बोलले जात आहे.
धरण फुटल्यावर जाग येणार का ?
काळम्मावाडी धरण उभारणीत बिद्री साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष हिंदुराव पाटील यांनी महत्वाचा वाटा उचलला होता. या धरणामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सुजलाम सुफलाम व्हावे हि त्यांची इच्छा होती. ज्यांनी प्रकल्पाच्या उभारणीला जमिनी दिल्या त्यांना धरणाच्या गळतीची चिंता लागली आहे. मात्र त्याचे गांभीर्य न घेता अनेकजण पाण्याच्या मागणीसाठी धडपडत आहेत. मेघोली धरण फुटून अनेक शेतकरी उध्वस्त झाले. आता हे धरण फुटल्यावरच संबधिताना जाग येणार का ? धरणातील पाण्याच्या वाटणीपेक्षा गळती रोखणे आज महत्त्वाचे आहे.
बाबासाहेब पाटील संचालक- बिद्री साखर कारखाना
अन्यथा आंदोलन….
या धरणाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने बांधकाम निकृष्ट झाले आहे. त्यामुळे धरणाला व कालव्याला गळती लागली. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. धरणाच्या गळतीबाबात आम्ही वेळोवेळी आवाज उठवला आहे. मात्र याचे गांभीर्य घेतले जात नाही. पाण्याच्या गळतीचा धोका मोठा आहे. धरणाखालील गावातील जनता भितीच्या छायेत जगत आहे. शासन याबाबत विचार करणार आहे की नाही? तात्काळ या बाबात ठोस उपाययोजना करण्यासाठी निर्णय घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन उभारणार.
अजित पोवार जिल्हाध्यक्ष, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना.