मान्यवर खेळाडूंच्या गटात नामांकन मिळालेला पहिला आशियाई पुरुष टेनिसपटू ठरण्याचा मान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेनिसमधील प्रतिष्ठेचे अनेक ग्रँडस्लॅम किताब मिळविलेला लिएंडर पेस हा ‘आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम’मधील खेळाडूंच्या श्रेणीत नामांकन मिळालेला पहिला आशियाई पुऊष ठरला आहे. 50 वर्षीय पेस हा 2024 च्या वर्गासाठी घोषित केलेल्या सहा नामांकितांपैकी एक असून खेळाडू श्रेणीमध्ये कारा ब्लॅक, अॅना इव्हानोविच, कार्लोस मोया, डॅनियल नेस्टर आणि फ्लाविया पेनेटा यांच्याशी त्याची स्पर्धा राहील.
ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी चिनी खेळाडू ली ना ही 2019 मध्ये ‘आयटीएचएफ’चे नामांकन मिळवणारी पहिली आशियाई खेळाडू ठरली होती. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमसाठी खेळाडूंच्या श्रेणीत नामांकन मिळालेला मी पहिला आशियाई पुऊष असून ही माझ्यासाठी सर्वांत मोठी गोष्ट आहे, असे पेसने म्हटले आहे. तीन दशके पूर्णपणे झोकून देऊन खेळल्यानंतर आणि ऑलिम्पिक तसेच डेव्हिस कपमध्ये 1.3 हून अधिक अब्ज भारतीयांचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर माझ्या मेहनतीला अशी मान्यता मिळाल्याने मला आनंद झाला आहे, असेही त्याने पुढे सांगितले.
माझे आई-वडील, भावंडे, प्रशिक्षक, डेव्हिस चषक कर्णधार आणि माझ्या कारकिर्दीत ज्यांनी ज्यांनी भूमिका बजावली त्या सर्वांचा मी खूप आभारी आहे, असेही पेसने म्हटले आहे. पेससोबत भारताचा माजी खेळाडू विजय अमृतराजलाही ‘कंट्रिब्युटर’ श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या श्रेणीत अमृतराजखेरीज प्रसिद्ध पत्रकार रिचर्ड इव्हान्स यांनाही स्थान मिळालेले आहे.
पेस दुहेरीत जागतिक यादीत पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. तीन दशकांच्या कारकिर्दीत त्याने दुहेरीत आठ ग्रँडस्लॅम किताब, मिश्र दुहेरीत 10 किताब मिळविलेले असून दोन्ही गटांत ‘करिअर स्लॅम’ पूर्ण केलेले आहे. एटीपी दुहेरी यादीतील अव्वल 10 खेळाडूंमध्ये तो एकूण 462 आठवडे राहिला, ज्यामध्ये 37 आठवडे तो अग्रक्रमांकावर राहिला. डेव्हिस चषकात 30 वर्षे भारतासाठी मुख्य आधारस्तंभ राहिलेल्या पेसच्या नावावर दुहेरीतील 43 विजयांसह स्पर्धेचा विक्रम आहे. 1996 मध्ये तो टेनिसमधील भारताचा एकमेव ऑलिम्पिक पदकविजेता ठरला होता. त्याने अॅटलांटा गेम्समध्ये कांस्यपदक मिळवले होते.