युएन’च्या बैठकीत भारताने पाकिस्तानला पुन्हा सुनावले खडे बोल
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानला आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानने आधी 26/11 च्या दहशतवाद्यांवर कारवाई करावी आणि जम्मू-काश्मीरचा व्यापलेला भाग रिकामा करावा, त्यानंतरच भारताबाबत कोणतेही भाष्य करण्याचे धाडस दाखवावे, असे खडे बोल भारताच्यावतीने सुनावण्यात आले. भारताने पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचा आरोपही केला आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला होता.
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका दिला आहे. यूएनजीएच्या दुसऱ्या समितीसाठी संयुक्त राष्ट्रातील भारताच्या सचिव पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या विरोधात निराधार आणि दुर्भावनापूर्ण प्रचार करण्यासाठी या व्यासपीठाचा गैरवापर करण्याचा पाकिस्तान हा नेहमीचा अपराधीपणा आहे. पाकिस्तान मानवी हक्कांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी अनावश्यक मुद्दे उपस्थित करत असल्याची जाण संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय संघटनांच्या सदस्य देशांना असल्याचे गेहलोत यांनी ठणकावले.
‘कब्जातील भारतीय जागा रिकामी करावी’
पेटल गेहलोत म्हणाल्या, ‘आम्ही पुन्हा एकदा पुनऊच्चार करतो की जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित प्रकरणे पूर्णपणे भारताच्या अंतर्गत बाबी आहेत. पाकिस्तानला आमच्या देशांतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याचा अधिकार नाही. दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानला तीन पावले उचलावी लागतील. पहिले म्हणजे सीमापार दहशतवाद थांबवला पाहिजे. दुसरे, बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने ताब्यात घेतलेले भारतीय प्रदेश रिकामे करावेत आणि तिसरे, अल्पसंख्याकांविऊद्ध सातत्याने होत असलेल्या गंभीर मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवायला हवे असेही त्या पुढे म्हणाल्या.
…आधी स्वत: सुधारा!
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीकडे बोट दाखवण्यापूर्वी पाकिस्तानने स्वत:मध्ये सुधारणा करावी. पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाजातील महिलांची, विशेषत: हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांची स्थिती दयनीय आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या ताज्या अहवालानुसार, दरवषी देशात अल्पसंख्याक समुदायातील सुमारे 1,000 महिलांचे अपहरण केले जाते आणि त्यांचे जबरदस्तीने धार्मिक परिवर्तन आणि विवाह केले जातात. पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दहशतवादी संघटना आणि व्यक्तींना आश्र्रय देणारा देश आहे, असेही गेहलोत यांनी पाकिस्तानला उद्देशून सुनावले.