सीसीटीव्हीत दर्शन : नागरिकांनी घाबरू नये ; वनाधिकारी
सांखळी : सांखळी मतदारसंघात बिबट्या वाघाने दहशत निर्माण केली आहे. सुर्ल कडचाळ येथे एका वासरावर हल्ला चढवून ठार मारल्याची घटना ताजी असताना डिंगणे कुडणे परिसरात रॉकी यांनी लावलेल्या सीसीटीव्हीत तीन जून रोजी रात्री त्यांच्या घर परिसरात बिबट्या वाघ फिरत असल्याचे चित्रण कैद झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथील रहिवाशी रॉकी यांनी या व्हिडिओविषयी सविस्तर माहिती दिली आहे. याविषयी पर्ये वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास डिंगणे परिसरात बिबट्या वाघ असल्याचा कॉल आला असल्याचे सांगितले. तसेच त्याला पकडण्यासाठी सुर्ला गावात सापळा रचल्याचे अधिकारी म्हणाला. तसेच नागरिकांनी उगाच घाबरून जाऊ नये मात्र संध्याकाळी रात्री जरा काळजी घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. उपलब्ध माहितीनुसार सांखळी मतदारसंघात परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या वाघ फिरत असल्याचे अनेक लोकांनी पाहिले होते.त्यात कोणी पट्टेरी वाघ असल्याचा दावा करत होते. यामुळे परिसरात वाघसंबंधी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाळी, सुर्ला, वेळगे, कुडणे, होंडा या भागात खाणी बंद काळात सामसूम वातावरण असल्याने विविध जनावरे या भागात रात्रीच्यावेळी निदर्शनास येतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.