प्रतिनिधी/ बेळगाव
कुष्ठ रोगाविषयी असलेले गैरसमज दूर होवून जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा पंचायत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कुष्ठरोग जागृती अभियानाला सुरूवात झाली आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार आहे.
या दोन आठवड्याच्या कालावधीत तालुक्यातील विविध गावांमध्ये कुष्ठ रोगाबाबत असलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज दूर केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेमध्ये जागृतीचे काम विभागामार्फत केले जाणार आहे. समाजात असलेल्या चुकीच्या समजुतीमुळे कुष्ठरोग्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे थांबविण्यासाठी जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे.
हिंडलगा, बेळगुंदी, उचगाव यासह इतर गावांमध्ये हे अभियान राबवून जनमानसात जागृती केली जाणार आहे. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना उपचार दिले जात असून, नागरिकांनी या ठिकाणी उपचार घ्यावेत, असे आवाहन देखील जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चांदणी देवडी यांनी केले आहे.
संपूर्ण जिल्हाभर 13 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. शिवाय या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पथनाट्याद्वारे तालुका पातळीवर जागृती मोहीम राबविली जाणार आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, बी. एस. मारीहाळ यासह कुष्ठरोग नियंत्रण विभागाचे कर्मचारी, अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.