युवा पिढीला सुसंस्कृत बनविण्याचा शिवप्रतिष्ठानकडून प्रयत्न : देखाव्यांच्या माध्यमातून उलगडला शिवाजी महाराजांचा जीवनपट
प्रतिनिधी /बेळगाव
‘देशासाठी जगायचं रं, शिवबानं सांगावा धाडलाय रं’ अशी वीररसाने भरलेली गाणी म्हणत हजारो धारकऱयांवर देशप्रेमाचे संस्कार दुर्गामाता दौडमधून केले जात आहेत. नवरात्रोत्सवामध्ये दुर्गादेवीच्या नावाचा जागर करत मंदिरांमध्ये दर्शन घेऊन युवा पिढीला सुसंस्कृत बनविण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठान करीत आहे. बुधवारी हजारोंच्या संख्येने धारकरी दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाले होते.
तिसऱया दिवशीच्या दौडला राणी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरापासून सुरुवात झाली. टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक दयानंद शेगुणशी यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. बुधवारच्या दौडमध्ये हजारोंच्या संख्येने महिला, युवती, युवक व वयोवृद्ध सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांचा जीवनपट देखाव्यांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी करण्यात आला.
भुईकोट किल्ला येथे मिलिटरी युनिटतर्फे स्वागत करण्यात आले. त्यानंतर किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरात दौडची सांगता झाली. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी सपत्निक आरती केली. ध्येयमंत्राने दौडचा समारोप झाला. माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनीलकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
शिवाजीनगर, गांधीनगर येथे जल्लोषी स्वागत
दुर्गामाता दौडचे बुधवारी चव्हाट गल्ली, शिवाजीनगर, गांधीनगर या मराठमोळय़ा परिसरातील गल्ल्यांमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. प्रत्येक गल्लीत भव्य रांगोळय़ा आणि फुलांची आरास केल्याने परिसरात नवचैतन्य पसरले होते. शिवाजीनगर येथे अनेक मंडळांनी शिवकालीन सजीव देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गांधीनगर येथे नागरिकांनी घरोघरी स्वागत केले. फुलांचा वर्षाव करत सुवासिनींनी औक्षण केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फौंडेशन व युवा सेनेच्यावतीने धारकऱयांना पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जात होते.
सुवर्णसिंहासनासाठी कर्तव्यनिधी
रायगडावर पुनर्स्थापित करण्यात येणाऱया 32 मण सुवर्णसिंहासनासाठी कर्तव्यनिधीचे संकलन व जागृती केली जात आहे. चव्हाट गल्ली येथील अभिर प्रफुल्ल शिरवलकर यांनी 5 हजार 555 रुपयांचा धनादेश सुवर्ण सिंहासनासाठी शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द केला. इतर शिवभक्तांनीही कर्तव्य निधीसाठी सामोरे यावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले.
शुक्रवार दि. 30 रोजीचा दौडचा मार्ग
श्री दुर्गामाता मंदिर खासबाग येथून दौडला प्रारंभ होणार आहे. भारतनगर क्रॉस नं.1, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगाम्मा मंदिर, भारतनगर (हमाल गल्ली), भारतनगर क्रॉस नं. 5, क्रॉस नं. 4, रयत गल्ली, ढोरवाडा, सप्पार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, मारुती मंदिर तेग्गीन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नूरकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प क्रॉस नं. 3, हरिजनवाडा, हरिमंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजीनगर, पाटील गल्ली मंगाई मंदिर येथे सांगता होणार आहे.