ऑनलाईन टीम / श्रीनगर :
काश्मीरमध्ये पंपोरच्या द्रंगबल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर ओमर मुश्ताक खानडे आणि त्याच्या साथीदाराला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पोलीस, आर्मी 50-आरआर (राष्ट्रीय रायफल्स) आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, पंपोरच्या द्रंगबल भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. त्यानुसार पोलीस, आर्मी 50-आरआर (राष्ट्रीय रायफल्स) आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोधमोहिम सुरू केली. दरम्यान, द्रंगबल भागात दहशतवाद्यांना घेराव घातल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत ओमर मुश्ताक खानडे आणि त्याच्या साथीदाराला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.