विदेशमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन : नामोल्लेख टाळून चीनवर साधला निशाणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी जागतिक व्यापाराबद्दल बोलताना पाश्चिमात्य देश वाईट नसल्याची टिप्पणी केली आहे. पाश्चिमात्य देश आशियाई आणि आफ्रिकन बाजारपेठांना स्वत:च्या सामग्रीद्वारे भरून टाकत नसल्याचे म्हणत जयशंकर यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात चीनला लक्ष्य केले आहे. पाश्चिमात्य देशांची मी बाजू घेत नसलो तरीही हे जग अत्यंत गुंतागुतींचे आहे. याकडे केवळ वाईट पाश्चिमात्य देश आणि विकसनशील देशांच्या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ शकत नाही. तसेच प्रत्येक गोष्टीचे खापर पाश्चिमात्य देशांवर फोडण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागणार असल्याची भूमिका जयशंकर यांनी मांडली आहे.
पाश्चिमात्य देशांना वाईट समजण्याच्या भूतकाळाच्या ‘सिंड्रोम’मधून बाहेर पडण्याची गरज आहे. मागील 15-20 वर्षांमध्ये असमान जागतिकीकरणामुळे आफ्रिक आणि आशियाई देशांच्या बाजारपेठांना स्वस्त सामग्रीने भरून टाकण्यात आले आहे. यामुळे संबंधित देशांच्या सामग्री निर्मितीची क्षमता तसेच रोजगावर प्रतिकूल प्रभाव पडल्याचे म्हणत जयशंकर यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात चीनला लक्ष्य केले आहे.
आज हे प्रश्न उभे ठाकले आहेत ते निर्माण होण्यास 15 ते 20 वर्षे लागली आहेत. अनेक देशांच्या बाजारपेठांमध्ये स्वस्त उत्पादनांचा जणू महापूरच आला आहे. यामुळे संबंधित देशांमधील उत्पादनांना वाव मिळू शकलेला नाही. अशा देशांमध्ये एक संताप निर्माण होत आहे, कारण या देशांचा वापर अन्य देशांच्या अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी केला जात आहे. या स्थितीकरता पाश्चिमात्य देशांना जबाबदार ठरविले जाऊ शकत नाही असे जयशंकर म्हणाले.
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी माजी राजनयिक अधिकारी टी.पी. श्रीनिवासन यांनी घेतलेल्या मुलाखतीत ही भूमिका मांडली आहे. या मुलाखतीत जयशंकर यांना जी-20 परिषदेत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग न येण्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. भारताकडे ग्लोबल साउथचे नेतृत्व जाऊ नये म्हणून चीन dरयत्नशील आहे का असे जयशंकर यांना विचारण्यात आले होते. दिल्लीत झालेल्या जी-20 परिषदेने जगाला चालविण्याचा अजेंडा केवळ धनाढ्या देशांचा गट किंवा एक किंवा दोन देश ठरवू शकत नसल्याचे दाखवून दिले आहे. भारत देखील अजेंडा ठरवू शकतो असे जयशंकर यांनी उत्तरादाखल म्हटले आहे.
जी-20 परिषदेपूर्वी भारतात झालेल्या ग्लोबल साउथ देशांच्या परिषदेबद्दल बोलताना जयशंकर यांनी आम्ही 125 देशांना एकत्र आणले, ग्लोबल साउथची कुठली व्याख्या नसून ही एक भावना असल्याचे उद्गार काढले आहेत.
राजकारणासाठी खलिस्तानचा वापर
कॅनडा-भारत संबंधांबद्दल जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. काही कारणांमुळे मोजके देश स्वत:च्या राजकारणात खलिस्तान सारख्या घटकांना स्थान देऊ लागल्यावर समस्या निर्माण होते. राजकारणात असे अनेकदा घडते, परंतु लोकशाहीत अशाप्रकारच्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. ज्या देशात हे घटक पोसले जात आहेत, त्या देशासाठी देखील ते चांगले ठरणार नाही हे विसरून चालणार नाही. आज हा प्रकार कॅनडात सुरू आहे, उद्या दुसऱ्या देशात हे घडू शकते असे जयशंकर यांनी म्हटले आहे.