पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांचे आवाहन
प्रतिनिधी / पणजी
गोवा हे लहान राज्य असले तरी पर्यटकांची रहदारी कायमच जास्त असते. त्यामुळे पर्यटकांची स्थिती आणि संख्या हाताळणे कधी-कधी कठीण होऊन जाते. सध्या वाढत असणाऱ्या प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण आणण्याकरिता सर्व स्तरावर प्रयत्न केला जात आहे. 2050सालापर्यंत नैसर्गिक स्रोतातील म्हणजेच समुद्रकिनारे, नद्यांना प्लास्टिकपासून मुक्ती करण्याकरिता लक्ष्य ठेवण्यात आले आहेत. हे लक्ष्य साधण्याकरिता प्रत्येकाने सहकार्य करणे गरज्sाचे आहे. प्रत्येकांनी याविषयी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी पहिल्या पर्यावरण चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर प्रोटोकोल अधिकारी संजित रॉड्रीगीस आयएएस, गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष महेश पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
पर्यावरण हा सर्वांचा लाडका विषय आहे. पर्यावरणासंबंधित अनेक बैठकी झाल्या. लोकांना चित्रपटाद्वारे पर्यावरणाशी जोडण्याची संकल्पना घेऊन पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी घेण्यात आली तसेच जी-20देशांनासुद्धा या संकल्पनेबाबत लिहिण्यात आले. या चित्रपट महोत्सवाद्वारे जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धनच्या विषयांना मांडण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवाकरिता उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक देशांनी आपले चित्रपट या महोत्सवाकरिता पाठविले. इतर देशात पर्यावरण विषय कसा हाताळला जातो तो चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. चित्रपट किंवा सिनेमा हे असे माध्यम आहे जे सहजरित्या लोकापर्यंत पोहोचते. यंदाची पर्यावरण दिनाची थीम प्लास्टिक प्रदूषण : कसे कमी करता येईल हे आहे. प्लास्टिक प्रदूषण गोव्यात मोठ्या प्रमाणात दिसून येते. गटारात, नाल्यात समुद्रात प्लास्टिकच्या वस्तू दिसून येतात. यावर लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने प्लास्टिक प्रदूषण टाळण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजात जागृती असणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रोटाकॉल अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चाटे यांनी केले.
पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांच्याहस्ते तीन दिवशीय पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. गोवा मनोरंजन सोसायटीच्या मॅकेनिज पॅलेस सभागृहात विविध विषयावरील चित्रपटांचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. या महोत्सवाला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसादही लाभला. या चित्रपट महोत्सवाचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात येत असल्याने आणि यंदाच्या पर्यावरण दिनाची थीम प्लास्टिकवर आधारित असल्याने संपूर्ण सजावट अनोख्या पद्धतीने करण्यात आली आहे.
गोवा मनोरंजन सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्लास्टिक बाटल्या कशाप्रकारे पुनर्वापर करता येतात याचे उदाहरण मांडले आहे. प्रवेशद्वारावर सजावट करून त्यावर प्लास्टिक बाटल्यांची मांडवरूपी अशी वेगळ्या पद्धतीची मांडणी करण्यात आली असून त्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये रंगीबेरंगी पाणी घालून आकर्षित करण्यात आले आहे. त्याशिवाय मॅकेनिज पॅलेसकडे जाण्याच्या मार्गावर पत्र्याच्या बाटल्यांचीही सजावट करण्यात आली आहे. सदर सजावट देश विदेशी सिनेरसिकांना तसेच पर्यटकांनासुद्धा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.