बसप खासदार दानिश यांच्या समर्थनार्थ विरोधकांची एकजूट, भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्यावर कारवाईची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी संसदेत बसपा खासदाराला अपशब्द वापरल्याचा मुद्दा जोर धरू लागला आहे. दानिश अली यांच्या समर्थनार्थ चार विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बिधुरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बिधुरी यांच्या वर्तनाचे प्रकरण आणि टिप्पण्या संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवाव्यात आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी पत्रात केली आहे. या पत्रात विरोधी पक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचे उदाहरण दिले आहे. अधीर रंजन चौधरी यांना पावसाळी अधिवेशनात टिप्पणी केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते, परंतु भाजप खासदारावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.
लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. दानिश अली अल्पसंख्याक समुदायातील आहेत. त्यांच्याविरोधात असंसदीय शब्द वापरण्यात आले. याहून खेदजनक बाब म्हणजे संसदीय इतिहासाला 75 वर्षे पूर्ण होत असताना ही घटना घडली. या प्रकरणाची विशेषाधिकार समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषी सदस्य रमेश बिधुरी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी बसपा खासदार कुंवर दानिश अली यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यादरम्यान राहुलने दानिश अलीला मिठी मारली. या भेटीचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या भेटीत राहुल यांच्यासोबत काँग्रेस नेते केसी वेणुगोपालही उपस्थित होते.