एलआयसी कार्यालयात घडला प्रकार
10 जणांवर गुन्हा, कर्मचारी जखमी
चिपळूण प्रतिनिधी
शहरातील एलआयसी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यास मनसे कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण केल्याची घटना शुकवारी घडली. यात कर्मचारी जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी 10 जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विष्णू शिंदे (42, खेंड), गुरुपसाद आदिनाथ पाटील (28, पानगल्ली), श्रावणी सतीश चिपळूणकर (35,), शहजीन मुन्वर हुजरे (35), स्मिता रेडीज (35,) राजेंद गोंजारे (37), स्वप्नील घारे (38, सर्व चिपळूण) यासह अन्य तिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद संतोष सीताराम चव्हाण (53, बुरुमतळी, चिपळूण) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण हे शहरातील एलआयसी कार्यालयात उच्च श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास ते कार्यालयात असताना गुन्हा दाखल झालेले 10 जण बेकायदेशीर जमून त्यांच्या कार्यालयात शिरले. यावेळी चव्हाण यांना जाब विचारत कार्यालयातच त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत चव्हाण यांच्या तोंडासह हातावर जखम झाली आहे.