प्रतिनिधी/ काणकोण
गोव्यातून विशेषत: काणकोण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मद्यसाठा गुजरात राज्यात पाठविण्यात येत असून जी व्यक्ती या गैरव्यवहारांत गुंतलेली आहे त्याच्या शोधार्थ परत एकदा गुजरातच्या पोलीस पथकाने या ठिकाणी येऊन तपासकार्याला प्रारंभ केला. मात्र त्यांच्या हातात काहीच लागले नसल्याची माहिती मिळाली आहे. ज्या व्यक्तीच्या शोधार्थ हे पथक आले होते ती व्यक्ती काणकोणची नसल्याची माहिती आता त्यांना मिळाली असून काणकोणच्या पोलिसांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे.
मागच्या महिन्यात गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. त्याअनुषंगाने गुजरातचे पोलीस पथक एकाच महिन्यात दोन वेळा काणकोणात येऊन गेले. दरम्यान, काही हितशत्रूंनी नावांचे साधर्म्य पाहून विनाकारण आपल्या पतीला या प्रकरणात गुंतविण्याचा प्रकार सुरू केला असून त्या व्यक्तींच्या विरोधात आपण अब्रुनुकसानी खटला गुदरण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोळे येथील डोरेटी डिसोझा यांनी दिली आहे. त्यांनी काणकोणच्या पोलीस स्थानकावर तक्रार करून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, गोव्यातून कर्नाटक राज्यात होणाऱ्या बेकायदा मद्य वाहतुकीविरुद्ध कर्नाटक अबकारी खात्याने कडक पावले उचलली असून दोन दिवसांपूर्वी माजाळी चेकनाक्यावर एका प्रवासी बसमधून कर्नाटकात नेण्यात येणारी अंदाजे 90 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची बेकायदेशीर दारू पकडण्यात आली. विशेष म्हणजे ही बस पोळे चेकनाक्यावरून तपासणी न करताच सोडण्यात आली होती.