ट्रकसह 53 लाखांचा मुद्देमाल जप्त, अबकारी विभागाची हलग्याजवळ कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
फिल्मी स्टाईलने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील एका युवकाला अटक करून ट्रकसह 53 लाख 8 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी हलगा येथील सुवर्ण विधानसौधजवळ ही कारवाई केली आहे.
शनिवारी पहाटे अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, सहआयुक्त फिरोजखान किल्लेदार, उपायुक्त वनजाक्षी एम. यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, उपअधीक्षक रवी मुरगोड, निरीक्षक रवींद्र होसळ्ळी, एस. एच. शिंगाडी, बी. एस. अटगल, महादेव कटीगन्नावर, वाहनचालक सय्यद जिलानी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
केए 25, एए 6469 क्रमांकाच्या ट्रकमधून फिल्मी स्टाईलने बेकायदा दारू वाहतूक करण्यात येत होती. यासंबंधीची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी सुवर्ण विधानसौधजवळ ट्रक अडवून तपासणी केली असता प्लायवूडची वाहतूक करण्यात येत असल्याचे चालकाने सांगितले. वरून प्लायवूड दिसले तरी आतून पोकळ कप्पे निर्माण करून त्या कप्प्यातून 28 लाख 4 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू लपविण्यात आली होती.
208 बॉक्समध्ये 18 विविध प्रकारची दारू व बियर जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी वीरेंद्र कल्पनाथ मिश्रा (वय 34) रा. वाराणसी, उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली आहे. ट्रकची किंमत 25 लाख रुपये इतकी होते. प्लायवूड भासवून त्याचे कप्पे निर्माण करून बेकायदा दारू वाहतूक करण्याचा प्रकार अबकारी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. अटक करण्यात आलेल्या चालकाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.