शिक्षक बदली प्रक्रिया घेणार वेग
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री अतिरिक्त शिक्षक व बदली कौन्सिलिंग प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दि. 6 जूनपासून राज्यात बदली प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. पुढील दीड ते दोन महिने ही प्रक्रिया चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील शैक्षणिक वर्षात बदली कौन्सिलिंग प्रक्रिया तांत्रिक अडचणीत अडकल्यामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने प्रक्रिया रखडली. नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा एकदा शिक्षक बदली प्रक्रियेला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्याचबरोबर शिक्षणमंत्री माधुस्वामी यांनी शिक्षक बदली प्रक्रियेला हिरवाकंदील दाखविल्याने वेळापत्रक तयार करण्यात आले.
मंगळवारी अतिरिक्त शिक्षकांची यादी
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात असणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची यादी मंगळवार दि. 6 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी शिक्षण विभागाकडून ही यादी तयार करण्यात आली होती. अतिरिक्त शिक्षकांच्या यादीवर कोणाचा आक्षेप असल्यास ते शिक्षक 10 जूनपर्यंत आक्षेप नोंदवू शकणार आहेत. त्यानंतर शिक्षण विभागाकडून पुन्हा चाचपणी केली जाणार असून बुधवार दि. 14 जून रोजी अंतिम अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर केली जाणार आहे. मंगळवार दि. 20 रोजी तालुका स्तरावरील कौन्सिलिंग तर बुधवार दि. 21 रोजी जिल्हास्तरीय कौन्सिलिंग केले जाणार आहे.
अतिरिक्त शिक्षकांसोबतच बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांचेही कौन्सिलिंग केले जाणार आहे. जून तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. अनेक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले होते. यातील काही शिक्षकांना तालुका पातळीवर तर काहीजणांना जिल्हा पातळीवर बदली हवी असल्याने त्या-त्याप्रमाणे बदलीसाठी कौन्सिलिंग प्रक्रिया राबविली जाणार आहे.