वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) बोगस विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केली आहे. कोणत्या विद्यापीठांना विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याची मान्यता प्राप्त नाही हे यादीद्वारे स्पष्ट होते. युजीसीकडून अशाप्रकारच्या 21 विद्यापीठांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 21 बोगस विद्यापीठे युजीसी ऍक्ट 1956 चे उल्लंघन करत आहेत. दिल्लीत सर्वाधिक बोगस विद्यापीठे असून या प्रकरणी उत्तरप्रदेश दुसऱया क्रमांकावर आहे.
दिल्लीत सर्वाधिक 8 बोगस विद्यापीठे आहेत. उत्तरप्रदेशात 4 बोगस विद्यापीठे असून पश्चिम बंगाल तसेच ओडिशामध्ये अशा विद्यापीठांची संख्या प्रत्येकी 2 इतकी आहे. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पुड्डुचेरी आणि आंध्रप्रदेशात प्रत्येकी एक बोगस विद्यापीठ आहे. केंद्रीय, राज्य/प्रांतीय अधिनियमाच्या अंतगंत किंवा कुठल्याही संस्थेकडून स्थापन करण्यात आलेले विद्यापीठच पदवी प्रदान करू शकते.