नद्यांच्या पाण्याची पातळीत वाढ, आपत्कालीन व्यवस्थापन सतर्क, झाडे कोसळून घरांची नुकसानी, चोरला मार्गावर दरडी कोसळण्याची भीती
वाळपई : गेल्या दोन दिवसापासून सत्तरी तालुक्मयामध्ये धुवांधार पाऊस लागत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी नुकसानी झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. केरी येथे प्रेमनाथ घाडी यांच्या घरावर जंगली झाड पडले. याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले तसेच रस्त्यावर झाडे पडल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. सत्तरी तालुक्मयातील प्रमुख नदी म्हादई व इतर नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. म्हादई नदीची पाणी पातळी दुपारी बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र नंतर पाण्याची पातळी खाली आल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान सत्तरी तालुक्मयाची उपजिल्हाधिकारी, मामलेदार यंत्रणा एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे. चोरला घाट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस लागत आहे. यामुळे सदर भागांमध्ये कोणत्याही क्षणी दरडी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे सदर भागातून प्रवास करताना प्रवाशांनी सतर्क रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे केले आहे.
ठिकठिकाणी पडझडीच्या घटना
गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन झाडे हटविली. केरी सत्तरी येथे प्रेमानंद घाडी यांच्या घरावर जंगली झाड कोसळून सुमारे 50 हजार ऊपयांचे नुकसान झाले तर सुमारे एक लाख ऊपयांचे मालमत्ता अग्निशामक दलाने वाचविली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. वाळपई, होंडा, गुळेली, नगरगाव, ठाणे आदी रस्त्यांवर जंगली झाडे कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मात्र दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन झाडे हटविली व वाहतूक सुरळीत केली.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
दरम्यान, सत्तरी तालुक्मयासह कर्नाटकात डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे म्हादई, वेळूस, वाळवंटीनदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. म्हादई नदीच्या पाण्याचीपातळी शनिवारी रात्रीपासून वाढत असल्याची माहिती नदीकाठच्या लोकांनी दिली. रविवारी दुपारपर्यंत पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणात वाढली होती. मात्र दुपारनंतर पावसाने काही प्रमाणत विश्र्रांती घेतल्यामुळे ही पातळी उतरत असल्याचे पहावयास मिळाले. या पावसामुळे आपत्कालीन यंत्रणा सतर्क झालेली आहे. उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, मामलेदार दशरथ गावस, संयुक्त मामलेदार विष्णू राणे हे अधिकारी एकूण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच जलसिंचन खातेही सतर्क आहे.
मंत्री विश्वजित राणेंकडून सतर्कतेचे निर्देश
स्थानिक आमदार तथा मंत्री विश्वजित राणे सुद्धा एकूण परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवले आहे. कोणत्याही क्षणी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अंजुणे धरण तुडुंब
अंजुणे धरण पुन्हा एकदा तुडुंब भरलेला आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी जलाशय पूर्ण भरला होता. यामुळे पाण्याचा विसर्ग चारही दरवाजातून केला होता.