ब्रेनडेड झालेल्या तीन व्यक्तींचे अवयवदान : डॉक्टरांच्या पथकाचे अभिनंदन
बेळगाव : केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बारा दिवसांत तीन रुग्णांवर यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण करण्यात आले आहे. ब्रेनडेड झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करण्यासाठी मान्यता दिल्याने हे प्रत्यारोपण शक्य झाले आहे. हुबळीच्या किम्स हॉस्पिटल येथील 25 वर्षीय तरुण दुर्गेश उप्पार, जयसिंगपूर येथील 42 वर्षीय साक्षी बांदिवडेकर व बेळगाव येथील 25 वर्षीय तरुण केएलई डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात दाखल झाले होते. ब्रेनडेडमुळे झालेल्या या रुग्णांचे यकृत बेळगाव जिल्ह्यातील बेल्लद बागेवाडी, करोशी व चिक्कमंगळूर येथील तीन रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले.
प्रत्यारोपणानंतर तीनही रुग्णांची प्रकृती चांगली असून लवकरच त्यांना घरी पाठविण्यात येईल, अशी माहिती हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष हजारे यांनी दिली. या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अॅस्टर हॉस्पिटल बेंगळूरचे डॉ. सोनल अस्थाना, केएलई हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. सुदर्शन चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. त्यांना भूलतज्ञ डॉ. राजेश माने, डॉ. मंजुनाथ पाटील, प्रशासक डॉ. बसवराज बिज्जरगी, समन्वयक गीता देसाई व बसवराज मजती व प्रशिक्षित परिचारिका यांचे सहकार्य लाभले. या शस्त्रक्रियेबद्दल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोरे व वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद यांनी डॉक्टरांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.