प्रतिनिधी,कोल्हापूर
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या लोकहिताच्या योजना तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आणि त्यांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा मतदार संघनिहाय नियोजन केले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.तर हातकणंगले मतदार संघांची जबाबदारी सत्यजित देशमुख (शिराळा)यांच्याकडे देण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघनिहाय जबाबदारी निश्चित केलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. मे महिन्यात झालेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने रणनीती आखली आहे.त्यातील एक भाग म्हणजे केंद्रातील मोदी सरकारच्या जनहिताच्या सुमारे 180 योजना देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे. महाराष्ट्रात या योजनांचा येत्या वर्षभरात प्रत्येक लाभार्थ्यांला लाभ मिळवून देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या सर्व राज्यातील प्रमुखांना दिले होते. त्यानंतर प्रदेश पातळीवर राज्यातील जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी राज्यातील लोकसभा मतदार संघ आणि प्रत्येक लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ निहाय जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी जाहीर केली.
लोकसभा मतदार संघ निहाय जबाबदारी
कोल्हापूर :खासदार धनंजय महाडिक-कोल्हापूर
हातकणंगले : सत्यजित देशमुख, शिराळा
सांगली : दीपक शिंदे-म्हैसाळ
सातारा : अतुल भोसले-कराड
विधानसभा मतदार संघ निहाय जबाबदारी
चंदगड : शिवाजीराव पाटील
राधानगरी-भुदरगड :राहुल देसाई
कागल : समरजितसिंह घाटगे
कोल्हापूर दक्षिण : शौमिका महाडिक
कोल्हापूर उत्तर : सत्यजित कदम
करवीर: हंबीरराव पाटील
शाहूवाडी-पन्हाळा :प्रवीण उर्फ राजू प्रभावळकर
हातकणंगले : अशोक माने
इचलकरंजी : अरविंद शर्मा
शिरोळ : राजवर्धन नाईक-निंबाळकर.
जबाबदारी दिलेल्यांना विधानसभेची उमेदवारी?
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघांपैकी सहा मतदार संघांत भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.विधानसभा मतदार संघनिहाय शासनाच्या योजना पोहचविण्याची जबाबदारी दिलेल्यांपैकी काही जणांना विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची लॉटरी लागू शकते.चंदगड, कागल, कोल्हापूर दक्षिण,कोल्हापूर उत्तर,हातकणंगले,इचलकरंजी या मतदार संघांत भाजपचे उमेदवार असणार आहेत.उर्वरीत मतदार संघात शिवसेना शिंदे आणि आमदार कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्ष यांचे उमेदवार असणार आहेत.
केंद्र सरकारच्या योजनांचा प्रत्येक गावातील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची जबाबदारी लोकसभा आणि विधानसभा मतदार संघनिहाय निश्चित केली आहे.जबाबदारी देण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करावे लागणार आहे.अहवाल प्रदेश भाजपला पाठवावा लागणार आहे.
-धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार