लंडन
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने नजीकच्या काळात क्रिकेटपटूंशी दीर्घकालीन कराराची योजना आखण्याचे जवळपास निश्चित केले आहे. विविध देशांमध्ये टी-20 प्रकारातील क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातात. आयपीएलसारख्या स्पर्धेत फ्रांचायजीकडून मोठ्या रकमेची बोली लावत इंग्लंडच्या अव्वल क्रिकेटपटूंना खरेदी केले जाते. दरम्यान या प्रक्रियेवर तोडगा काढण्याचे इसीबीने ठरविले आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने आता इंग्लंडच्या अव्वल क्रिकेटपटूंबरोबर खास तीन वर्षांच्या कालावधीसाठी कराराची योजना अंमलात आणण्याचे ठरविले आहे. दरम्यान मंडळाच्या खेळाडूंबरोबरील यापूर्वीच्या मध्यवर्ती कराराच्या अटींचा विचार केला जाईल. इसीबीकडून 26 नव्या कंत्राटाची ऑफर देण्यात येणार असून त्यापैकी 20 खेळाडूंबरोबरील करार किमान तीन वर्षांचा राहील. इंग्लंडचे अव्वल क्रिकेटपटू बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक आणि मार्क वूड यांच्याबरोबर इसीबीकडून तीन वर्षांच्या कालावधीचे पॅकेज राहील असे इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. या नव्या कराराच्या कालावधीला ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.