सध्या गोवा-कोकणात गणपती या लोकप्रिय दैवताचा उत्सव चालू असून नृत्य, नाट्या, गायन आदी कला आणि सांस्कृतिक त्याचप्रमाणे धार्मिक मूल्यांशी निगडीत अधिष्ठाता देव म्हणून इथल्या लोकमानसात त्याचे पूजन रुढ आहे. गणपती हे जरी आज गजमुखी, लंबोदर, सुपासारखे कान असलेला त्याचप्रमाणे हाती परशु, पाश आदी आयुधे धारण केलेला देव म्हणून वंदनीय ठरलेला असला तरी त्याच्या रुपात विविध संस्कृती, ऐतिहासिक पंरपरांचा आणि प्रवाहांचा विलोभनीय समन्वय झालेला पाहायला मिळतो. सोळाव्या शतकात गोव्यावरती आपली सत्ता स्थापन केल्यावर पोर्तुगीजकालीन धर्मोपदेशकांनी ख्रिस्तीकरणाची प्रक्रिया राबविण्यासाठी फादर व्रुवोने गणपती दैवताची निंदानालस्ती आरंभली, तत्पूर्वी भारतभरात घुसलेल्या मूर्तिभंजकांनी गणपतीच्या मूर्ती उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला परंतु असे असताना, शुभ कार्यारंभी त्याचे स्तवन, मनन आणि पूजन करण्यास भाविकांना रोखणे शक्य झाले नाही. आज चतुर्हस्त रुपात गणपतीच्या मूर्ती ठिकठिकाणी पूजल्या जात असल्या तरी प्राचीन काळात त्याच्या मूर्ती द्विहस्त होत्या, याची प्रचिती इतिहासात आढळते. संत शिरोमणी ज्ञानेश्वरी माऊलीने ‘ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या।’ असा उल्लेख केलेला असला आणि संत तुकाराम महाराजांनी ‘ॐकार प्रधान रुप गणेशाचे। हे तिन्ही देवांचे जन्मस्थान’ म्हटलेले असले तरी गणपतीची दैवत म्हणून उन्नयन प्रक्रिया जाणून घेताना, त्याच्या एकंदर स्वरुपाची कल्पना मिळते.
गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव, उत्तर कन्नड या प्रांतातल्या रणमाले लोकनाट्यातले अथवा रत्नागिरीतल्या परिसरातल्या नमन खेळातले गणपती स्तवन असो, नाट्या सादरीकरणाच्या आरंभी त्याच्यासमोर नतमस्तक होण्यात कलाकार धन्यता मानत आलेले आहेत. गोवा-कोकणातल्या रणमाले लोकनाट्याबरोबर दशावतारी लोकनाट्या त्याचप्रमाणे कर्नाटकी संस्कृतीतल्या यक्षगानाच्या परंपरेतल्या गणपती तर कधी ऋद्धी-सिद्धीसह तर कधी सरस्वतीसह विलोभनीय नृत्याचा आविष्कार घडविताना, प्रेक्षकांना आपल्या रुपात सामावून घेतो. गणपतीची दैवत म्हणून उद्गम पावलेली संकल्पना त्याला आदिम जमातीचे गजमुखी कुलचिन्हाबरोबर गणांचा मुख्य अधिपतीशी निगडीत असल्याचे स्पष्ट करताना त्याच्या मूळ स्वरुपाची जाणीव करून देते. मायेचा अधिष्ठाता आणि विश्वरुपी शरीर असलेला हा गणपती आपल्याकडे प्रचलित असलेल्या विविध लोककथांतून देवी पार्वतीचा सुपुत्र म्हणून वंदनीय ठरलेला असला तरी विविध ग्रंथांत त्याच्या स्वरुपाचा अभ्यास करताना तो म्हणजे शिवस्वरुपी असल्याचे स्पष्ट झालेले आहे. ऋग्वेदातले गणपती हे विशेषण गणाचा स्वामीसाठी वापरलेले असून, ब्रह्मणस्पती हा एक स्वतंत्र देव इंद्रादिकासारखा ऋग्वेदात वर्णिलेला आहे. कालांतराने निर्माण झालेल्या विविध पुराणांतून गजानन किंवा गणपती ही देवता विकसित पावलेली आहे. ऋग्वेदात रुद्राचा उल्लेख गणपती म्हणून केलेला आहे. भरतमुनीच्या नाट्याशास्त्रात तर गणपती, गणेश, गणराज ही विशेषणे पुन्हा पुन्हा रुद्रालाच लावलेली आहे. कौटिलीय अर्थशास्त्रात गजानन या देवतेचा उल्लेख आढळत नाही. वायुपुराणात शिवालाच गजेंद्र कर्ण, लंबोदर ही विशेषणे वापरलेली पाहायला मिळतात. प्रारंभी, एक स्वतंत्र ग्रामदेवता म्हणून अस्तित्वात असलेली गणपती कालांतराने नागर समाजाने स्वीकारल्यावरती तिचे स्वरुप झपाट्याने बदलत गेले. शुभकार्यारंभी तांदूळ, सातू किंवा गहू यांच्या पुंजीवर सुपारी किंवा नारळ ठेवून, त्यावर गणपतीचे आवाहन करून पूजा करण्याची परंपरा आहे. जपानमध्ये गणपतीच्या त्रिमुखी, ख्मेरमध्ये चतुर्मुखी, तिबेटात नारीरुपात तर नेपाळात सिंहारुढ गणपतीचे पूजन केले जाते. जी देवता क्रूर ग्रह म्हणून मानली जात होती, ती गुप्तकाळात शुभदायी देवता म्हणून विकसित पावली.
गजानन म्हणजे हत्तीचे मुख असलेला हा देव. हत्ती शाकाहारी असल्याकारणाने, प्राण्यांचे बलिदान वर्ज्य मानलेले असले तरी कर्नाटकातल्या खानापूर परिसरातल्या काही गावात चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहारी नैवेद्य गणपतीसमोर ठेवला जातो. महाराष्ट्रात गणपतीची विविध ठिकाणी असलेली आठ तीर्थक्षेत्रे अष्टविनायक यात्रेशी जोडल्यानंतर विशेष नावारुपास आली. तत्पूर्वी, पेशवाईच्या काळात गणपतीच्या पूजन परंपरेला राजाश्रय लाभल्यावरती, त्याचे महत्त्व विकसित होत गेले. इसवीसनाच्या पहिल्या शतकात श्रीलंकेतल्या मिहिनटाल येथे सापडलेली गणपतीची मूर्ती मध्य प्रदेशातल्या उदयगिरीत आढळलेली आहे. इंडोनेशियाच्या जावा बेटावरती इसवीसनाच्या अकराव्या शतकातील आसनस्थ गणपतीची मूर्ती, भारतापासून इतक्या दूर गणपतीची पूजन परंपरा पसरल्याची प्रचिती आणून देते. पेशवाईत भाद्रपद शुक्ल पक्षातल्या चतुर्थीपासून दशमीपर्यंत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा क्हायचा परंतु पुण्यात भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केला व लोकमान्य टिळकांनी 1893 पासून लोकजागृतीसाठी व राष्ट्रीय ऐक्याच्या पूर्ततेप्रीत्यर्थ सार्वजनिक गणेशोत्सवाला जेव्हा नवा आयाम मिळवून दिला तेव्हापासून या उत्सवाचे स्वरुप विस्तारत गेलेले आहे.
आज प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या पूजनाला प्राधान्य लाभलेले असून अशा मूर्तीच्या विसर्जनामुळे पर्यावरणीय समस्या उद्भवत असल्याने त्यांच्या वापरावरती ठिकठिकाणच्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांनी प्रतिबंध घातलेले आहेत परंतु असे असताना, अशा मूर्तीचा वापर रोखण्यासाठी लोकजागृती आणि लोकसहभाग महत्त्वाचा ठरलेला आहे. गणपती ही देवता कधीकाळी जंगलनिवासी जमातीची असल्याचा मतप्रवाह रुढ असून, आदिवासी जमातीत वाघाला जसे देवतास्वरुप मानले त्याचप्रमाणे घनदाट जंगलात वास्तव्यास असणाऱ्या या महाकाय प्राण्याला गजमुखी देवता म्हणून शेती, बागायतींचे रक्षण व्हावे, या हेतूने पूजन परंपरा विकसित केली असावी आणि त्यानंतर द्विभुज, चतुर्भुज, अष्टभुज गणपती मूर्तीचे महत्त्व निर्माण होत गेले असावे. शृंगाररसाला कालांतराने ज्या लावणी परंपरेत प्राधान्य दिले, तिथेही गणपतीच्या स्तवनाला महत्त्व लाभलेले आहे. महाभारताची रचना करताना व्यासमुनींनी गणपतीस लेखनिक होण्यास आवाहन केल्याचा जो समज दृढ आहे, त्याला अधिकृत ऐतिहासिक आधार नाही परंतु विघ्नकर्ता असणारा हा देव विघ्नहर्ता झाल्यावरती बुद्धी, ज्ञान याचा अधिष्ठाता म्हणून लोकमानसाने त्याची उपासना करण्याला प्राधान्य दिले.
दक्षिण भारतातल्या चोला राजवंशाने शिवाचे नटराजाच्या स्वरुपात पूजन करून नृत्य, नाट्या, कला, संस्कृतीचे दैवत म्हणून मान्यता दिली. भारतीय धर्मसंस्कृतीने ज्या गजाननाला पार्वती पुत्र मानला, त्याचठिकाणी तो शिवस्वरुपी म्हणून वंदनीय ठरला. त्याच्या भोवताली लोकमानसाने आपल्या संकल्पनेतून असंख्य लोककथा, लोकगीतांची श्रवणीय साखळी निर्माण केली व त्याला शुभदायक म्हणून पूजला. गोवा-कोकणातल्या कष्टकरी लोकमानसाने त्याला पर्वत धारण करणाऱ्या पार्वतीमातेच्या मृण्मयी बालकाच्या रुपात पूजताना, या गजमुखी दैवताला जंगलात असल्याची जाणीव निर्माण व्हावी म्हणून त्याच्या माथ्यावरती श्रावण-भाद्रपदात माळरानावर, जंगलात फुलणाऱ्या मोसमी फळे-फुले, कंदमुळे यांची सजावट करून, त्याला अन्नदात्याच्या रुपात पुजून जीवन कृतार्थेची प्रार्थना करण्यात धन्यता मानली.
– राजेंद्र पां. केरकर