सध्या गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. विविध रुपांमधील आणि विविध वाहनांवर विराजमान गणेश भगवान आपल्याला पहावयास मिळत आहेत. भगवान गणेश हे वैश्विक दैवत आहे. जगामधील अनेक देशांमध्ये या दैवताच्या प्राचीन मूर्तीं सापडल्या आहेत. यावरुन आपली संस्कृती जगात सर्वत्र पसरली होती, हे आपल्याला समजते. आपल्याकडे घरगुती गणेशोत्सवाप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा केला जातो. या सर्व गणपतीच्या मूर्तींचे प्रथेप्रमाणे विसर्जन केले जाते. या विसर्जनासह गणेशोत्सवाची सांगता केली जाते.
पण जगात असे एक गणेश भगवान आहेत, की ज्यांचा उत्सव साजरा केला जातो, पण विसर्जन केले जात नाही. त्यांचे विसर्जन करावे असा विचार लोकांच्या मनाला शिवतही नाही. हे गणेश भगवान आहेत, मुस्लीमबहुल इंडोनेशिया देशात. ते एकेकाळी जागृत असणाऱ्या एका ज्वालामुखीच्या तोंडावरच विराजमान आहेत. ते जागृत दैवत मानले जातात. तसेच ते ज्वालामुखीपासून आपले संरक्षण करतात, अशी परिसरातील जनतेची भावना आहे. भगवान गणेशाची ही मूर्ती 700 वर्षांपेक्षा जुनी आहे. तिची स्थापना इंडोनेशियात जेव्हा हिंदूंचे राज्य होते आणि प्रजाही अधिकतर प्रमाणात हिंदू होती तेव्हा केली गेली आहे. जोपर्यंत हे गणेश भगवान जागृत आहेत, तो पर्यंत हा ज्वालामुखी जागृत होणार नाही आणि लोक सुरक्षित राहतील अशी दृढ भावना आहे. ज्या ज्वालामुखी पर्वतावर हे गणेश विराजमान आहेत, तो माऊंट ब्रामो म्हणून ओळखला जातो. त्याच्या परिसरात वास्तव्य करणारे लोक टेनेगर या नावाने ओळखले जातात. या देशात गणेशाची 140 मंदिरे आहेत.
या गणपती पूजा येथील लोक प्रतिदिन करतात. मोठा उत्सवही प्रतिवर्ष साजरा केला जातो. आपल्यासारखी तेथे गणेशचतुर्थी साजरी करण्याची प्रथा नसली तर वेगळ्या प्रकारे या विघ्नहर्त्याचा गणेशोत्सव साजरा केला जातो.