घर विकलं, पैसे संपले तरीही मानली नाही हार
पतीच्या उपचारासाठी ‘ती’ रस्त्यावर उतरून करतेय काम
स्वतःच्या पतीच्या उपचारासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱया एका महिलेची कहाणी सध्या व्हायरल होत आहे. या महिलेचा पती रस्ते अपघातानंतर कोमात गेला असून मागील तीन महिन्यांपासून त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याकरता मोठा खर्च झाल्याने महिलेला स्वतःचे घर विकावे लागले आहे. या महिलेला पतीवरील उपचार सुरू ठेवण्याकरता अधिक पैशांची गरज आहे.
हा पैसा उभा करण्यासाठी आणि पतीला जीवनदान मिळावे म्हणून या महिलेने चक्क रस्त्यावर उतरून काम करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या या कृतीचे सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर कौतुक होत आहे. या महिलेने पतीच्या उपचारासाठी फूटपाथवर मोमोज विकण्यास सुरुवात केली आहे. यातून मिळणाऱया पैशांमधून ती पतीवर उपचार करवित आहे.
नि असे आडनाव असलेली ही महिली चीनच्या जिआंगशी प्रांतात राहते. 2016 मध्ये तिचा विवाह झाला होता आणि तिला सध्या दोन मुले आहेत. तीन महिन्यांपूर्वी तिच्या पतीच्या कारचा अपघात झाला होता, तेव्हापासून तो रुग्णालयात दाखल आहे, अपघातानंतर या महिलेच्या पतीवर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून याकरता मोठा खर्च आला आहे. या महिलेला स्वतःचे घर विकावे लागले आहे, मुलांचा खर्च आणि उपचारासाठी तजवीज करण्याकरता तिने आता फास्टफूड विकण्यास सुरुवात केली आहे.
या महिलेच्या संघर्षाची कहाणी आता टिकटॉकवर व्हायरल होत आहे. कितीही कठिण असले तरीही मला जे हवे आहे ते मला मिळेल. मी पतीवर प्रेम करते, काहीही कष्ट करून त्याला वाचविणार आहे, त्याच्या परतण्याची मी वाट पाहत आहे, एक किंवा दोन वर्षे नव्हे तर वर्षानुवर्षे त्याची वाट पाहण्याची माझी तयारी आहे असे नि या महिलेने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. पतीची प्रकृती सुधारली असून तो लवकरच शुद्धीत येण्याची अपेक्षा असल्याने तिने म्हटले आहे.