केआरला 75 धावांनी नमवले, डी कॉक-हुडाची फटकेबाजी
सुकृत मोकाशी / वृत्तसंस्था
डी कॉक (50), दीपक हुडाची (41) फटकेबाजी व अवेश खान, जेसॉन होल्डरने मिळवलेल्या प्रत्येकी 3 बळीच्या जोरावर लखनौ सुपरजायंट्सने शनिवारी दुसऱया आयपीएल साखळी सामन्यात केकेआरचा 75 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला आणि गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 176 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचा डाव 14.3 षटकात केवळ 101 धावांमध्येच गुंडाळला.
विजयासाठी 177 धावांचे आव्हान असताना केकेआरतर्फे आंद्रे रसेल (45), सुनील नरेन (22), फिंच (14) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. अवेश खानने 19 धावात 3 तर जेसॉन होल्डरने 31 धावात 3 बळी घेतले. याशिवाय, मोहसिन खान, दुष्मंता व रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लखनौच्या धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. बाबा इंद्रजित शून्यावरच बाद झाला. मोहसीन खानने त्याला बदोनीकरवी झेलबाद केले. धावसंख्या 11 असताना फॉर्मात असलेला श्रेयस अय्यरही सहा धावा काढून चमीराचा शिकार ठरला. बदोनीनेच त्याचा झेल घेतला. यावेळी कोलकाताची दोन बाद 11 अशी अवस्था झाली होती.
यानंतर कोलकाताची मदार फिंचवर होती. पण, तोही फार काळ तग धरु शकला नाही. त्याला 14 धावांवर होल्डरने डी कॉककरवी झेलबाद केले. कोलकाताने पॉवर प्लेच्या पहिल्या 6 षटकात 3 बाद 25 धावा काढल्या होत्या. यानंतर लगेच मागच्या मॅचमधील अर्धशतकवीर नितीश राणा दोन धावांवर बाद झाला. अवेश खानने त्याला त्रिफळाचीत केले. कोलकाता यावेळी 4 बाद 25 होती. धावसंख्या 69 असताना रिंकू सिंगही सहा धावांवर परतला. त्याला बिश्नोईने बाद केले.
आंद्रे रसेलची फटकेबाजी
कोलकाता 4 बाद 25 असताना रसेल मैदानात आला. त्याने लखनौच्या गोलंदाजांवर काऊंटर ऍटॅक करत अवघ्या 19 चेंडूत 45 धावा केल्या. 45 धावांवर बाद झाला. पण, त्याआधी त्याने फटकेबाजी करत प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. पाच षटकार आणि तीन चौकारांसह त्याने 45 धावा केल्या. अवेश खानने त्याला होल्डरकरवी झेलबाद केले. रसेल बाद झाल्यावर कोलकाताचा डाव गडगडला. अनुकुल रॉयही शून्यावर बाद झाला. अवेशने एकाच षटकात दोघांना बाद केले.
यानंतर धावसंख्या 99 धावा झाल्या असताना नरेन 22 धावा काढून बाद झाला. यानंतर साऊदी आणि हर्षित राणाही बाद झाले. कोलकाताचा 14.3 षटकात सर्वबाद 101 धावा झाल्या आणि लखनौने 75 धावांनी हा सामना जिंकला. आवेश खान, होल्डर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर, मोहसीन खान, चमीरा आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
प्रारंभी लखनौला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. फॉर्मात असलेला राहुल हा डी कॉकबरोबर समन्वयात गोंधळ उडाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या डायरेक्ट थ्रोवर एकही बॉलचा सामना न करता धावबाद झाला. त्यानंतर डी कॉक आणि हुडाने डाव सावरत पॉवर प्लेच्या सहा षटकात धावसंख्या 1 बाद 66 वर नेली. दरम्यान, डी कॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, अर्धशतक होताच तो लगेच बाद झाला. त्याला नरेनने शिवम दुबेकरवी झेलबाद केले. त्याने चार चौकार आणि तीन षटकारांसह आपली खेळी सजविली. त्याच्यात आणि हुडामध्ये 71 धावांची भागीदारी झाली.
पहिल्या दहा षटकामध्ये लखनौने दोन बाद 90 धावा बनविल्या होत्या. धावसंख्या 107 असताना हुडा 41 धावा काढून बाद झाला. त्याला रसेलने अय्यरकरवी झेलबाद केले. लखनौची धावसंख्या 122 असताना कृणाल पंडय़ाही 25 धावांवर रसेलची शिकार ठरला.
लखनौच्या डावातील 19 वे षटक ठरले नाटय़मय
शिवम मावीने टाकलेले 19 वे षटक नाटय़मय ठरले. या षटकात पाच षटकार मारले गेल्याने 30 धावांची लयलूट झाली. त्यातले सलग तीन षटकार स्टोईनिसने मारले. चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. अय्यरने त्याचा झेल घेतला. त्यानंतर आलेल्या होल्डरनेही सलग दोन षटकार मारले. दरम्यान, शेवटच्या षटकात होल्डर ला साऊथीने 12 धावांवर बाद केले. यानंतर शेवटच्या चेंडूवर चमीराही धावबाद झाला. लखनौने 20 षटकात 7 बाद 176 धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताकडून रसेलने दोन बळी घेतले. साऊदी, नरेन, मावीने प्रत्येकी एक बळी घेतला. पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला. कोलकाता नाईड रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपरजायंट्स ः 20 षटकात 7 बाद 176 (क्विन्टॉन डी कॉक 29 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 50, दीपक हुडा 27 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 41, मार्कस स्टोईनिस 14 चेंडूत 28, कृणाल पंडय़ा 27 चेंडूत 25. अवांतर 4. आंद्रे रसेल 2-22, साऊदी, मावी, नरेन प्रत्येकी 1 बळी).
कोलकाता नाईट रायडर्स ः 14.3 षटकात सर्वबाद 101 (आंद्रे रसेल 19 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांसह 45, सुनील नरेन 12 चेंडूत 22, ऍरॉन फिंच 14 चेंडूत 14. अवांतर 3. अवेश खान 3 षटकात 3-19, जेसॉन होल्डर 2.3 षटकात 3-31, मोहसिन खान, दुष्मंता चमीरा, रवि बिश्नोई प्रत्येकी 1 बळी).