‘द बॅटल फॉर कोंकणी अॅण्ड स्टेटहूड ऑफ गोवा’चे राजभवन येथे प्रकाशन
पणजी : लुईझिन फालेरो हे जरी माजी मुख्यमंत्री, मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी गोव्याच्या राजभाषेसाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यासाठी जो लढा दिला तो निश्चितच नोंद घेण्याजोगा आहे. भारतीय संविधानामुळे मिळालेली लोकशाही हीच सुप्रीम पॉवर आहे आणि याचाच वापर करून लुईझिन फालेरो व इतर कोंकणी चळवळीतील गोमंतकीय जनतेने कोंकणीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी दिलेला लढा हा इतिहासाची साक्ष नोंदवतो. हा इतिहास भावी पिढीला कळावा आणि त्याचा भविष्यात फायदा व्हावा, यासाठी फालेरो यांचे ‘द बॅटल फॉर कोंकणी अॅण्ड स्टेटहूड ऑफ गोवा’ हे ऐतिहासिक पुस्तक इतिहासाची साक्ष देईल, अशा शब्दांत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पुस्तकाविषयी गौरवोद्गार काढले. दोनापावला-राजभवन येथील जुन्या दरबार सभागृहात आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राज्यपाल पिल्लई प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी खास निमंत्रित म्हणून कोकणी साहित्यिक अॅङ उदय भेंबरे, रिटा पिल्लई, पुस्तकाचे लेखक लुईझिन फालेरो, रिचल लुईझिन फालेरो उपस्थित होत्या.
अॅङ भेंब्रे म्हणाले, गोंयकार माणूस इतिहास घडवतो; पण हा इतिहास संग्रहित करून किंवा लिहून ठेवण्याची सवय गोमंतकीयांमध्ये खूप कमी आहे. त्याचा फटका निश्चितच बसतो. विधानसभा अधिवेशन काळात जनतेच्या प्रश्नाविषयी व इतर निर्णयाविषयीचा रेकॉर्ड संग्रहित केला जातो. पण, विधानसभा अधिवेशनकाळात बाहेर घडणाऱ्या गोष्टींची नोंद कोण ठेवणार हा सध्याचा प्रश्न आहे. गोवा मुक्तिनंतर जे घडले त्याचे महत्त्व जर आपण समजून घेतले नाही तर त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला भोगावे लागतील. गोवा मुक्तिनंतरच्या काळात आम्ही आंदोलनामुळे भाषिक स्वराज्य निर्माण करू शकलो. ओपीनियन पोलमध्ये आम्ही आमचे राज्य स्वत: म्हणजे लोकांनी चालवावे यासाठी झगडत राहिलो. ओपीनियन पोल व राजभाषा आंदोलनात जर आम्ही विजय मिळवू शकलो नसतो तर गोवा हे केवळ एखाद्या जिह्यासारखे मर्यादित राहिले असते, असेही ते म्हणाले.
लेखक लुईझिन फालेरो म्हणाले, गोवा राज्य, राजभाषा, कोकणी भाषा आणि सांस्कृतिक दायज सुरक्षित राहण्याचा हेतूने ‘द बॅटल फॉर कोंकणी अॅण्ड स्टेटहूड ऑफ गोवा’ हे पुस्तक काढण्यात आले आहे. गोवा मुक्तिनंतर कोकणीला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी गोमंतकीयांनी जी चळवळ हाती घेतली आणि सत्यऊपात ती उतरवली यापुढे अशी चळवळ होऊच शकत नाही. हजारो गोमंतकीयांनी सोसले, भोगले, आपले रक्त सांडले, हाल-अपेष्टा सहन केल्यामुळेच कोकणीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे कोंकणी भाषेसाठी ज्यांनी त्याग व बलिदान दिले अशा सर्वांना हे पुस्तक अर्पित करतो, असेही फालेरो यांनी सांगितले. हे पुस्तक काढण्यासाठी गोवा विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन यांचे खूप मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी मुद्दामहून नमूद केले.
पुस्तक ठरणार अस्सल स्त्रोत
मडगावमधील राममनोहर लोहिया आणि पणजीतील आझाद मैदानावर जमलेल्या हजारो लोकांच्या शक्तीमुळेच सरकारवर दबाव येऊन कोंकणीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे हे यश फक्त लोकांचेच असे म्हणावे लागेल. लुईझिन फालेरो यांचे हे पुस्तक म्हणजे इतिहास सांगणारा अस्सल स्त्रोत आहे. इतिहासाचा आढावा घेतल्यास फालेरो यांचे हे पुस्तक म्हणजे इतिहासाचा अस्सल स्त्रोत म्हणून नक्कीच नावाऊपास येईल, असे उदय भेंब्रे म्हणाले…