10 हजार जवानांच्या सुरक्षेत शपथविधी ः
वृत्तसंस्था / ब्राझिलिया
ब्राझीलमध्ये लूला डा सिल्वा यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. सिल्वा हे तिसऱयांदा देशाचे अध्यक्ष झाले आहेत. शपथविधी सोहळय़ादरम्यान 10 हजार जवानांना सुरक्षेकरता तैनात करण्यात आले होते. तर स्वतःच्या नेत्याला अध्यक्ष झाल्याचे पाहण्यासाठी त्यांचे समर्थक मोठय़ा संख्येत सोहळय़ाच्या ठिकाणी पोहोचले होते.
आम्ही ब्राझीलला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणू. अनेक वर्षांपर्यंत लढाई करून आम्ही जे अधिकार, स्वातंत्र्य आणि विकास मागील काही काळात गमाविला ते परत मिळविले जाणार आहे. गरीबांच्या जीवनात सुधारणा, वांशिक तसेच लैंगिक समानतेसंबंधी काम करणार असल्याचे आश्वासन लूला डा सिल्वा यांनी देशाला दिले आहे.
ब्राझीलमध्ये लूला डा सिल्वा हे अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याने जायर बोल्सोनारो यांच्या समर्थकांमध्ये रोष आहे. यामुळे देशात सातत्याने दंगली आणि हिंसक निदर्शने झाली आहेत. याचमुळे लूला डा सिल्वा यांच्या शपथविधी सोहळय़ाकरता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शपथविधी सोहळय़ात सामील होण्यासाठी लोकांना बॉटल, कॅन, फ्लॅग मास्ट म्हणजेच ध्वजाच स्तंभ आणण्यास मनाई करण्यात आली होती. माझ्या शासनकाळात देशात कायदा-सुव्यवस्थेचे पालन होणार आहे. जे लोक गुन्हा करतील, त्यांना शिक्षा भोगावीच लागेल असे म्हणत लूला डा सिल्वा यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात बोल्सानोरो यांना इशारा दिला आहे.
बोल्सोनारो विदेशात
माजी अध्यक्ष बोल्सोनारो हे देश सोडून गेल्याने लूला यांनी एका बिगरश्वेतवर्णीय महिलेच्या हातून प्रेसिडेन्शियल सॅश घेतला. प्रेसिडेन्शियल सॅश म्हणजे कपडय़ाचा एक बँड असतो, जो खांद्यापासून कंबरेपर्यंत परिधान केला जातो. हा सॅश केवळ अध्यक्षच परिधान करू शकतात. जेव्हा एखाद्या अध्यक्षाचा कार्यकाळ संपुष्टात येतो, तेव्हा अधिकृत सोहळय़ात हा बँड नव्या अध्यक्षाला सोपविण्यात येतो, ब्राझीलमध्येही या परंपरेचे पालन केले जाते. परंतु बोल्सोनारो हे देश सोडून गेल्याने ही लोकशाहीवादी परंपरा पाळता आली नाही. 1985 मध्ये सैन्य राजवट संपुष्टात आल्यावर पहिल्यांदाच असे घडले आहे.
दिव्यांगासोबत प्लानाल्टो पॅलेसमध्ये दाखल
शपथविधी सोहळय़ानंतर लूला डा सिल्वा हे प्लानाल्टो पॅलेसमध्ये पोहोचले, जेथे ते स्वतःच्या कुटुंबासमवेत विविध समुदायाच्या लोकांना सोबत घेऊन गेले. यात एक बिगरश्वेतवर्णीय मुलगा, एक दिव्यांग सामील होता. याला बोल्सोनारो विरोधी एक प्रतीक म्हणून मानले जात आहे. बोल्सोनारो हे स्वतःच्या वंशद्वेषी टिप्पणींकरता ओळखले जात होते.
नव्या सरकारसमोरील आव्हाने
लूला यांच्या सरकारसमोर पर्यावरण संतुलनाचे मोठे आव्हान आहे. अमेझॉन जंगलाचा 60 टक्के हिस्सा ब्राझीलमध्ये आहे. अमेझॉनचे जंगल जागतिक हवामानाचे संतुलन कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच जागतिक तापमानवाढ विरोधात लढण्यास मदत देखील करते. परंतु या जंगलातील वणवे, अवैध उत्खनन आणि वृक्षतोडीमुळे ब्राझीलला 90 वर्षांमधील सर्वात भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. लूला यांना पर्यावरण रक्षणाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.
580 दिवस राहिले तुरुंगात
77 वर्षीय लूला सिल्वा यांनी निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचार संपविणार असल्याचे प्रचारादरम्यान म्ह्टले होते. बोल्सोनारो यांच्या शासनकाळात भ्रष्टाचार वाढल्याचे त्यांचे म्हणणे होते. लूला यांना यापूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच अध्यक्षपद सोडावे लागले होते. तसेच त्यांना 580 दिवस तुरुंगात काढावे लागले आहेत.