पशुपालकांची चिंता वाढली : पशुसंगोपनच्या डोकेदुखीत भर, बाधित जनावरे पुन्हा वाढू लागल्याने दुभत्या जनावरांवर परिणाम
बेळगाव : लम्पी या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू लागला आहे. त्यामुळे पशुपालकांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 407 जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. तर 24 जनावरे रोगमुक्त झाली आहेत. तर समाधानकारक बाब म्हणजे 5 लाख 23 हजार 837 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, प्रादुर्भाव सर्वत्र पुन्हा हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे पशुसंगोपनची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये 5 लाख 49 हजार 540 गोवर्गीय जनावरे आहेत. विशेषत: गोवर्गीय जनावरांना या रोगाची लागण होऊ लागली आहे. मात्र, यंदा गतवर्षीपेक्षा रोगाची तीव्रता कमी असल्याने अद्याप एकही जनावर दगावले नाही. त्यामुळे पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, बाधित जनावरे पुन्हा वाढू लागल्याने दुभत्या जनावरांवर परिणाम होऊ लागला आहे. महाराष्ट्रात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जनावरांच्या आठवडी बाजारावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापारी, दलाली आणि शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने सीमाबंद केल्या असत्या तर आज आठवडी बाजार बंद करण्याची वेळ आली नसती. मात्र, पशुसंगोपनच्या बेजबाबदारपणाचा फटका पशुपालकांना बसला आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पशुपालकांना सूचना
विशेषत: सीमाहद्दीवरील गोकाक, हुक्केरी, अथणी, कागवाड, निपाणी आदी तालुक्यांमध्ये लम्पीग्रस्त जनावरे आढळू लागली आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव पसरू नये, यासाठी जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, लागण झालेल्या काही जनावरांच्या रक्ताचे नमुने बेंगळूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. शिवाय लागण झालेल्या गावांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पशुपालकांना सूचना केल्या आहेत. दरम्यान, बाधित जनावर आढळून आल्यास तातडीने पशुसंगोपन खात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी
जिल्ह्यातील सीमाहद्दीतील तालुक्यांमध्ये काही प्रमाणात लम्पीबाधित झालेली जनावरे आढळली आहेत. काही जनावरांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. शिवाय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनादेखील लसीकरणाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
– डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन)