वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
2022 च्या खेलो इंडिया युवा क्रीडा महोत्सवातील येथे सुरू असलेल्या महिलांच्या 18 वर्षाखालील वयोगटाच्या हॉकी स्पर्धेत मध्यप्रदेश आणि हरियाना यांनी आपले उपांत्यफेरीचे सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
पहिल्या उपांत्य सामन्यात मध्यप्रदेशने ओदिशाचा 2-0 असा पराभव केला. मध्यप्रदेश संघातील भूमिक्षा साहू तसेच प्रियांका यादव यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱया उपांत्य सामन्यात हरियानाने झारखंडचा 4-2 असा फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. हरियानातर्फे सावी, पिंकी यांनी प्रत्येकी 1 तर गुरुमेल कौरने 2 गोल केले. झारखंडतर्फे निशा मिन्झने 2 गोल केले. आता या स्पर्धेत ओदिशा आणि झारखंड यांच्या तिसऱया स्थानासाठी सामना होईल.