सोने, रोकड, हवालाची रक्कम, नोटा बदलासह इतरही फसवणूक प्रकारात भागीदार : अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे
बेळगाव : रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतर नोटा बदलून देण्याचे सांगून फसवणुकीचा फंडा सुरू आहे. खरे तर दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी अद्याप भरपूर अवकाश आहे. तरीही नोटा बदलण्याच्या नावाने फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. या प्रकारातही एका पोलिसाला अटक झाली आहे. गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांचा सहभाग कधी संपणार? असा प्रश्न या प्रकरणानंतर उपस्थित होत आहे. सावर्डे, ता. तासगाव, जि. सांगली येथील समीर भानुदास भोसले (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोटा बदलून देण्याचे सांगून फसवणूक केल्याच्या आरोपावरून कागवाड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मिरज शहर पोलीस स्थानकातील सागर सदाशिव जाधव (वय 31) रा. मिरज, त्याचा साथीदार अरिफ अजीज सागर (वय 34) रा. जमखंडी, लक्ष्मण नाईक (वय 36) रा. लिंगनूर या तिघा जणांना अटक केली आहे. बेळगावात चोर-पोलिसांचा खेळ नवा नाही. नागमणी, गजमणी, राईस पुलरच्या नावे हा खेळ सतत होत असतो. कधी या खेळात खऱ्या पोलिसांचा सहभाग असतो तर आणखी कधी तोतया पोलिसांचा प्रवेश होत असतो. मिरज टाऊन पोलीस स्थानकातील पोलीस फसवणुकीसाठी मंगसुळीपर्यंत पोहोचला. तसे बेळगाव येथील अनेक अधिकारी व पोलीस फसवणूक, लूटमार, वाटमारीसाठी महाराष्ट्रात पोहोचल्याची उदाहरणे आहेत.
या प्रकरणावरून अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 9 जानेवारी 2021 रोजी मंगळूरहून कोल्हापूरकडे जाणारी कार हत्तरगी टोलनाक्याजवळ अडवून त्या कारमधील 5 किलो सोने पोलिसांनी हडप केले होते. संपूर्ण राज्यात गाजलेल्या या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी यमकनमर्डी, संकेश्वर, कॅम्प, हिरेबागेवाडी आदी वेगवेगळ्या पोलीस स्थानकात वेगवेगळी प्रकरणे दाखल करून संशयितांची धरपकड केली खरी. अद्याप कारमधून हडप केलेले पाच किलो सोने कुठे गेले, ते कोणाकडे आहे? याचा उलगडा झाला नाही. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचलो तर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडणार, या भीतीने हे प्रकरण दडपण्यात आले आहे. सीआयडीने तर बेळगाव उत्तर विभागाचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनाही नोटीस बजावली होती. याच प्रकरणात त्यांची बेंगळूरला तडकाफडकी बदली झाली होती. प्रत्यक्षात ही घटना 9 जानेवारी 2021 रोजी घडली असली तरी 26 मे 2021 रोजी पहिले एफआयआर दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास अद्याप लागला नाही. काही पोलीस अधिकारी आपले गैरधंदे चालविण्यासाठी दलालांची नेमणूक करतात. केए 19, एमएच 9451 क्रमांकाची मंगळूरहून कोल्हापूरकडे जाणारी कार अडवून त्या कारमधील पाच किलो सोने हडप करण्यातही अधिकाऱ्यांबरोबरच दलालांचाही सहभाग होता. मंगळूर येथील तिलक पुजारी या सराफी व्यावसायिकाशी संबंधित हे सोने होते. दागिने बनविण्यासाठी हे सोने कोल्हापूरला नेताना यमकनमर्डी पोलिसांनी ते हडप केले होते.
परस्पर दागिने-रोकड लुटण्याचे प्रकार
केवळ ही एकच घटना नव्हे तर बेळगाव परिसरात पोलीस अधिकाऱ्यांनीच वाहने अडवून दागिने व रोकड गिळंकृत केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कर चुकविण्यासाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बेकायदा वाहतूक केली जाते. अनेक प्रकरणात हवालाशी संबंधित रक्कमही महामार्गावरून एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचवली जाते. बेळगावात अनेक वर्षांपासून तळ ठोकून असलेले काही अधिकारी व पोलीस अशा प्रकरणांच्याच मागावर असतात. एखादे सावज सापडले तर पोलीस स्थानकात येण्याआधीच परस्पर दागिने व रोकड लुटण्याचे प्रकार करतात.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची डोळेझाक
यमकनमर्डी पोलीस स्थानकासमोर उभ्या करण्यात आलेल्या कारमधील पाच किलो सोने हडप करण्यात आले. त्यावेळचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रे•ाr यांच्या रेट्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले होते. नोटा बदलून देण्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या टोळीत मिरज येथील पोलिसाला अटक झाल्यानंतर बेळगाव येथील जुन्या घटनांना उजाळा मिळाला असून महामार्गावर आजही कार अडवा, सोने-रक्कम पळवा हे प्रकार सुरूच आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी सोयिस्करपणे अशा प्रकारांकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे खाकी वर्दीतील गुन्हेगारांची हिंमत वाढते.