मराठा समाजाच्या प्रश्नांवर सह्याद्री अतिथिगृहावर बैठक
ऑनलइन टीम/तरुण भारत
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृह येथे एक बैठक पार पडली. (maharashtra cm eknath shinde-convenes meeting with maratha organisations on reservation)
या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, साधारणपणे २ हजार १८५ उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी ४१९ उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत तर १ हजार ०६४ उमेदवारांना विविध विभागांमध्ये तत्काळ नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येईल. उर्वरित ७०२ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी, तसेच विभाग यांच्यामार्फत विशेष मोहीम घेण्यात येईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) आणि सारथी संस्था (SARTHI) अधिक सक्षम होण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या बैठकीत सांगितले. दरम्यान, येत्या काळात स्थापन करण्यात येणारी उपसमिती मराठा आरक्षण संदर्भातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या संस्थांना सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाची बाजू अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी अभ्यास करण्यात येईल.असेही शिंदे यांनी सांगितले.
हे ही वाचा : डिसेंबर अखेरपर्यंत पालिका निवडणूक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेला राज्य शासनामार्फत निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतची स्थिती सक्षमपणे मांडण्यासाठी हे शासन प्रयत्न करेल.