ऑनलाईन टीम/तरुण भारत
अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Election) गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काल सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठ ३१.७४ टक्के मतदान झाले आहे. तर मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. तर निवडणुकीचा निकाल रविवारी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.
अंधेरीत पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी दिली होती. लटकेंविरोधात भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली, तरी ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार होते.
अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रावर गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के; सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दिली. निवडणुकीचा निकाल रविवारी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.