कुंडल/प्रतिनिधी
कुंडल (ता. पलूस) येथील महाराष्ट्र कुस्ती मैदान पावसामुळे स्थगित करण्यात आल्याची माहिती कुस्ती कमिटीने दिली. सालाबादप्रमाणे दुपारी 1 च्या दरम्यान पेटी वाजत मैदानाकडे आणण्यात आली. मैदानाचे पूजन आमदार अरूण लाड, हैबतराव लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासो लाड आदींच्या हस्ते झाले.
लहान गटातील काही चटकदार कुस्त्या झाल्यावर वरुण राजाने बरसायला सुरुवात केली. आयोजकांनी त्यातूनच काही कुस्त्या केल्या पण पावसाचा जोर वाढल्याने आयोजकांनी सर्वानुमते महाराष्ट्र कुस्ती मैदानाला स्थगिती दिल्याचे सांगितले यामुळे हजारो कुस्ती शौकीनांची निराशा झाली.
कुंडल येथील महाराष्ट्र कुस्ती मैदान निकाली कुस्त्यासाठी प्रसिद्ध असून आज या मैदानात अनेक दिग्गजांच्या लढती होणार होत्या. पण दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पावसाची संततधार सुरू झाली. 3.40 च्या दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने संयोजकांनी कुस्ती मैदान स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जानेवारीनंतर भरवावे अशी मागणी होत आहे.