वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑइल इंडिया लिमिटेड आणि ओएनजीसी विदेश लिमिटेड या कंपन्यांना सरकारने अलीकडेच मोठा दिलासा दिला आहे. अर्थ मंत्रालयाने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु क्षेत्रातील कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडला ‘महारत्न’ कंपनीचा दर्जा बहाल केला आहे. या संदर्भातल्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. याचप्रमाणे आणखी एक कंपनी ओएनजीसी विदेश या कंपनीला ‘नवरत्न’चा दर्जा सरकारने बहाल केला आहे. या उचललेल्या सरकारच्या पावलामुळे ऑइल इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाला आता यापुढे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र निर्णय घेणे शक्य होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी ऑइल इंडिया लिमिटेड ही तेरावी महारत्न दर्जा प्राप्त करणारी कंपनी ठरली आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 41 हजार कोटीहून अधिक महसूल प्राप्त करण्यासोबतच 9854 कोटी रुपयांचा निव्वळ नफाही प्राप्त केला होता.
महारत्न दर्जा कसा मिळतो?
महारत्न हा दर्जा प्राप्त करण्यासाठी कंपन्यांना त्यांची सरासरी उलाढाल 25 हजार कोटीहून अधिक असावी लागते. शिवाय वर्षाच्या आधारावर पाहता 15000 कोटीपेक्षा अधिक नेटवर्थ असावी लागते. याचसोबत गेल्या 3 वर्षामध्ये सरासरी नफा 5 हजार कोटी रुपयांहून अधिक राहणे आवश्यक असते.