करमाळा प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या सोलापूर- पुणे मार्गावर करमाळा तालुक्यातील केम हद्दीत (खानट वस्ती) लुप लाईनवर मालगाडीचे दोन रेल्वे इंजिन रुळावरुन खाली घसरले आहेत. रविवारी (ता. 4) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र रेल्वेचे नुकसान झाले आहे.
सोलापूर ते पुणे मार्गावर रेल्वेचे दोन ट्रॅक आहेत. यातील सोलापूरकडून पुणेच्या दिशेने जाणार्या ट्रॅकवरुन मालगाडी जात होती. या गाडीचे रेल्वे इंजिन घसरले आहे. मेन व लुप लाईन असे दोन प्रकार असतात. त्यातील लुप लाईनवर हा प्रकार घडला. ब्रेक फेल झाल्यामुळे हा प्रकार झाला असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर विभागातील रेल्वे आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत.