वृत्तसंस्था/ कौलालंपूर
मंगळवारपासून येथे सुरू होणाऱया विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मलेशिया खुल्या सुपर 750 पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधू आणि एच.एस.प्रणॉय यांच्यावर प्रामुख्याने भारताचे आव्हान राहील.
मध्यंतरी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला चालू महिन्याच्या प्रारंभी झालेल्या इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत चीनच्या जियाओकडून पराभव पत्करावा लागला होता. या धक्यातून सिंधूने स्वतःला लवकर सावरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. सिंधूने दोनवेळा ऑलिंपिक स्पर्धेत पदक पटकाविले आहे. मलेशिया बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचा सलामीचा सामना थायलंडच्या पी.चोचुवाँगशी होणार आहे. सिंधू आणि चोचुवाँग यांच्यात आतापर्यंत आठ सामने झाले असून सिंधूने यापैकी पाच सामने जिंकले आहेत. जागतिक महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात चोचुवाँग 10 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालचा सलामीचा सामना अमेरिकेच्या वांगशी होणार आहे. सायनाने पहिल्या फेरीतील सामना जिंकल्यास तिला पुढील फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराशी लढत द्यावी लागेल. पुरूष विभागात भारताच्या एच.एस. प्रणॉयला पहिल्या फेरीत मलेशियाच्या डॅरेन लियुशी लढत द्यावी लागणार आहे. भारताच्या बी.साई प्रणितचा पहिल्या फेरीतील सामना इंडोनेशियाच्या अँथोनी सिनीसुकाशी तर समीर वर्माचा पहिल्या फेरीतील सामना इंडोनेशियाच्या ख्रिस्टीशी त्याचप्रमाणे राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता पी.कश्यपचा पहिल्या फेरीतील सामना कोरियाच्या हिओ वाँगशी होणार आहे. या स्पर्धेत दुहेरीत भारताच्या तीन जोडय़ा सहभागी होत आहेत.