भाजपकडून संताप व्यक्त
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे मंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देवासमान असल्याचे विधान केले आहे. अनेकवेळा पुजारी चोरी करू शकतो, परंतु देव चोरी करू शकत नसल्याचे चट्टोपाध्याय यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद उभा ठाकला आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते तसेच माजी शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेते शिक्षक भरती घोटाळय़ात सामील असल्याचा आरोप होत असताना चट्टोपाध्याय यांनी ही टिप्पणी केली आहे.
ममता बॅनर्जी या देवासमान असून आम्ही त्यांची पूजा करतो. देवाची पूजा करणारा पुजारी चोर ठरू शकतो, परंतु देवाला चोर ठरविता येत नाही. प्रसंगी मी चोर ठरू शकतो, परंतु ममता बॅनर्जी कदापिही चोर ठरणार नाहीत असे चट्टोपाध्याय यांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्य़ातील खडदहमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते आता ममता बॅनर्जींची तुलना देवांशी करत आहेत. पक्षनेतृत्वाला खूश करण्याच्या संस्कृतीचे हे द्योतक आहे. तृणमूल काँग्रेसकडून केले जाणारे घोटाळे आता वारंवार उघडकीस येत असल्याची टीका भाजप नेत्या प्रियांका टिबरेवाल यांनी केली आहे.
घोटाळय़ांप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन बाळगल्याचे लोकांना कळले आहे. चोरी किंवा घोटाळा होताना पाहून कुठलाच देव गप्प बसणार नाही, परंतु ममता बॅनर्जी घोटाळय़ांकडे डोळेझाक करून केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधू शकतात. राज्य विधानसभेत ईडी आणि सीबीआय विरोधात प्रस्ताव मांडू शकतात अशी उपरोधिक टीका भाजप नेत्याने केली आहे.
तृणमूल काँग्रेसला त्याच्या पापांची शिक्षा जनताच करणार आहे. तृणमूलबद्दल जनतेचा भ्रमनिरास झाल्यामुळेच त्या पक्षाचे नेते अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत असे माकप खासदार विकास रंजन भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.