‘त्या’ कंत्राटदारानेही मागितली माफी, महापौर-नगरसेवकांचाही आक्षेप
बेळगाव : शहरातील एलईडी बल्ब लावण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. त्यांचे काम योग्यप्रकारे झाले नाही म्हणून नगरसेवकांनी संबंधित कंपनीच्या मालकांना फोन केला असता त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्या कंपनीचे राहुल चक्रवर्ती हे शनिवारी सर्वसाधारण बैठकीत हजर झाले. त्यांनी सर्वांची माफी मागितली. त्यानंतर महापौरांना पार्किंग इमारत बांधणी शुभारंभाला बोलाविले नाही म्हणून सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. त्याचवेळी नगरसेविका वैशाली भातकांडे यांनाही बोलाविले नाही म्हणून त्यांनीही आक्षेप नोंदविला. त्यामुळे बराच गोंधळ उडाला.
एलईडी बसविण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले होते. त्या कंपनीने योग्यप्रकारे काम केले नाही म्हणून नगरसेवकांनी जोरदार विरोध केला होता. एका नगरसेवकाने संबंधित कंपनीचे ठेकेदार राहुल चक्रवर्ती यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी उद्धट उत्तरे दिली, असा आरोप नगरसेवकांनी मागील सर्वसाधारण सभेमध्ये केला होता. त्यामुळे सर्वांनीच संबंधित ठेकेदाराने सभागृहात उपस्थित राहून माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार राहुल चक्रवर्ती हे सभागृहात दाखल झाले. बोलण्याच्या ओघात नगरसेवकांचा किंवा इतर अधिकाऱ्यांचा अवमान झाला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यावर पडदा पडला.
तत्पूर्वी सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी बापट गल्ली येथे पार्किंग इमारतीचा शुभारंभ करताना महापौरांना डावलल्याचा आरोप केला. यावर आमदार राजू सेठ यांनी व इतर विरोधी नगरसेवकांनी यापूर्वी महापौर, उपमहापौरांचा अवमान झाला आहे, त्याबद्दल तुम्ही सभागृहात माहिती द्या, असे सांगितले. यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षानेही काही चुका केल्यामुळे त्यांनी शेवटी नमते घेतले. महापौरांना डावलल्याचे सांगताच नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक रवी साळुंखे यांनीही जोरदार आक्षेप नोंदविला. कपिलेश्वर तलावाच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ करताना आम्हालाही डावलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे बराच उशीर गोंधळ उडाला. मात्र, एकमेकांवर आरोप सुरूच होते. शेवटी मानापमान बाजूला ठेवून पुढील कामकाजाला सुरुवात केली. एकूणच शनिवारच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये मानापमानावरून बराच वेळ आरोप-प्रत्यारोप झाले.
वॉर्डांतील पथदीपांवरून अधिकारी धारेवर…
शहरातील बऱ्याच वॉर्डांमध्ये पथदीप योग्यप्रकारे बसविण्यात आले नाहीत. अनेकवेळा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेतील अधिकारी तसेच हेस्कॉमचे अधिकारीही थातुरमातूर उत्तरे देत आहेत. असे किती दिवस चालणार? असे म्हणत महापालिकेतील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. अधिकाऱ्यांना धारेवर धरताच संबंधित विभागाचे देशपांडे यांनी आता प्रत्येक वॉर्डामध्ये संबंधित नगरसेवकाला बोलावूनच त्या समस्या दूर करू, असे आश्वासन दिले. यापूर्वीही तुम्ही अनेकवेळा आश्वासन दिले आहात. रात्री बारा वाजता फोन करता? असा प्रश्न करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. शेवटी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी गणेशोत्सवानंतर योग्यप्रकारे पथदीपांची दुरुस्ती तसेच इतर कामे केली जातील, असे सांगितले.
कॅन्टोन्मेंटला सामावून घेण्याबाबत ‘ना हरकत पत्र’ मंजूर
महापालिकेमध्ये बहुमताने ठराव संमत
कॅन्टोन्मेंटचा परिसर महापालिकेमध्ये सामावून घेण्याबाबत गेल्या दीड-दोन वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू होती. शनिवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये महापौर शोभा सोमनाचे यांनी याबाबतचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला. त्यावेळी कॅन्टोन्मेंट परिसर कशाप्रकारे महापालिकेकडे सुपूर्द केला जाणार आहे, याची माहिती अधिकाऱ्यांकडे मागण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांनी सध्या केवळ त्यासाठी ना हरकत पत्र देणे गरजेचे आहे, असे सांगितल्यानंतर सभागृहामध्ये सर्वानुमते ना हरकत पत्र देण्याचा ठराव मांडून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
यावेळी नगरसेवकांनी कॅन्टोन्मेंटचा कोणता परिसर महापालिकेमध्ये समाविष्ट केला जाणार आहे, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना आहे का? असे विचारले असता मनपा उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी सध्या आम्हाला राज्य आणि केंद्र सरकारला याबाबतचे ना हरकत पत्र देणे गरजेचे असल्याचे सांगितले. सदर प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारकडूनच महापालिकेला आला आहे. त्यामुळे आम्ही त्याला केवळ मंजुरी देणे गरजेचे आहे. कॅन्टोन्मेंटचा कोणता प्रदेश, कॅन्टोन्मेंटच्या कोणत्या इमारती, कोणत्या स्थानिक संस्था महापालिकेला देणार आहेत, ते नंतरच समजणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती केंद्र आणि राज्य सरकारकडून आल्यानंतर ती सभागृहात दिली जाईल, असे रेश्मा तालिकोटी यांनी यावेळी सांगितले. आमदार राजू सेठ त्याचबरोबर नगरसेवक हणमंत कोंगाली, रवी धोत्रे, विरोधी पक्षनेते मुजम्मील डोणी यांनी मंजुरी देण्याबाबत होकार दिल्याने तो ठराव मंजूर झाला आहे. कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतराचा मार्ग आता मोकळा झाला असून केंद्र सरकारच्या आदेशानंतर बराच भाग महापालिकेकडे मिळणार आहे. तसेच महापालिकेचे उत्पन्नदेखील वाढणार आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी ना हरकत पत्र देण्यासाठी मंजुरी दिली.
जागा खरेदी-विक्रीचे प्रकरण लोकायुक्तांकडे
बसवण कुडची येथील जागेची विक्री करताना त्यामध्ये गैरप्रकार झाला आहे. या गैरप्रकारामध्ये अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली यांनी केला. कशाप्रकारे जमिनीचे व्यवहार बेकायदेशीर झाले, याची संपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली. त्यावेळी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी त्या जागेसंदर्भातील पीआयडी आम्ही ब्लॉक केल्याचे सांगितले. मात्र, ब्लॉक करून चालणार नाही तर त्यामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती दिली. हे एकच प्रकरण नाही तर अशी अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळे ही सर्व प्रकरणे मी स्वत:च चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांकडे सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे नगरसेवकांनी यावेळी सांगितले.