भाजप, शिवसेना (शिंदे गट), जनसुराज्य शक्ती पदाधिकाऱ्यांचा समावेश
कोल्हापूर / प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवर 20 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून गुरुवारी आदेश काढण्यात आले. यामध्ये खासदार संजय मंडलिक,आमदार विनय कोरे, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासह 20 जणांची वर्णी लागली आहे. यामध्ये भाजपसह शिवसेना (शिंदे गट), जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या, शनिवारी होत आहे. त्याच्या एक दिवस अगोदर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधीमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नामनिर्देशित सदस्य म्हणून खासदार संजय मंडलिक (मुरगूड, ता. कागल), आमदार विनय कोरे (वारणानगर, ता. पन्हाळा), जिल्हा नियोजनसंबंधी ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रतापराव देशमुख (नरंदे, ता. हातकणंगले), यशवंत नांदेकर (तिरवडे, ता. भुदरगड), प्रसाद खोबरे (तारदाळ, ता. हातकणंगले), जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी मंत्री भरमू पाटील (बसर्गे, ता. चंदगड), माजी आमदार अमल महाडिक (शिरोली पुलाची, ता. हातकणंगले), भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (कागल), माजी नगरसेवक सत्यजित कदम (रुईकर कॉलनी), माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई (गारगोटी, ता. भुदरगड), माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने (शिरोळ), सत्यजित पाटील (सोनाळी, ता. कागल), अमित कामत (आर. के. नगर, मोरेवाडी, कोल्हापूर), शिवाजी चौगुले (पंडेवाडी, ता. राधानगरी), डॉ. दशरथ काळे (अब्दुल्लाट), संजय पोवार (राजारामपुरी 10 वी गल्ली), अंकुश निपाणीकर (राजारामपुरी 10 वी गल्ली), अभयकुमार मगदूम (माणगाव, ता. हातकणंगले) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खासदार संभाजीराजे समर्थकांना संधी
स्वराज्य संघटनेचे संस्थापक खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे कट्टर समर्थक संजय पोवार यांना संधी देण्यात आली आहे. विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची वर्णी लागली आहे.