वार्ताहर /किणये
बस्तवाड-हालगा येथील मंगाईदेवी यात्रा मंगळवारी उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रेनिमित्त बस्तवाड, कोंडसकोप जवळील परिसरात भक्तांची अलोट गर्दी झाली होती. नवसाला पावणारी मंगाईदेवी असल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत भक्त दर्शन घेत होते.
मंगळवारी सकाळी देवीची विधिवत पूजा करून ओटी भरण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या व गावकऱ्यांच्या उपस्थितीत गाऱ्हाणा कार्यक्रम झाला. यानंतर दिवसभर महिलांनी देवीची मनोभावे ओटी भरली.
येणाऱ्या भक्तांसाठी दर्शनाची पंचकमिटीच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती. सुवर्ण विधानसौधजवळील कोंडसकोप गावाजवळच्या निसर्गरम्य परिसरात मंगाईदेवीचे मंदिर आहे. सकाळपासूनच पंचक्रोशीतील भाविक यात्रेसाठी येऊ लागले होते. कोंडसकोप क्रॉसपासून देवीच्या मंदिरापर्यंत रस्त्यावर गर्दी झाली होती.
यात्रेनिमित्त खेळणी, आईक्रीम व इतर विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते. महिला व बालचमूनी याचा आनंद लुटला.