रेस वॉक, महिला हँडबॉल, सायलिंगमध्ये भारतीय खेळाडूंना अपयश
वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
भारताची टेबलटेनिसपटू मनिका बात्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीत शरथ कमल व जी. साथियान यांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले.
पुरुष एकेरीत शरथ कमलने झुंजार खेळ केला, पण त्याला चिनी तैपेईच्या चिह युआन चुआंगकडून 11-7, 12-10, 9-11, 11-5, 10-12, 6-11, 11-8 असा पराभव स्वीकारावा लागला. दोन गेम्स गमविल्यानंतर त्याने मुसंडी मारत नंतर 3-3 अशी बरोबरी साधली. पण अंतिम गेममध्ये त्याला मनाचा समतोल राखता न आल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. त्याआधी जी.साथियानला चीनच्या चिकिन वांगने 11-3, 11-3, 11-6, 11-3 असे हरविले होते. महिला दुहेरीत सुतीर्था मुखर्जी-ऐहिका मुखर्जी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठताना थायलंडच्या जिनिपा व वानविसा यांच्यावर 11-8, 11-7, 11-4 अशी मात केली. मात्र श्रीजा अकुला व दिया चितळे यांना पाचव्या मानांकित जपानच्या मिवा हरिमोटो व मियू किहारा यांच्याकडून 11-3, 11-5, 11-8 असा पराभव पत्करावा लागला.
महिला एकेरीत मनिका बात्राने संघर्षपूर्ण लढतीत थायलंडच्या सुथासिनी सवेताबटचा 4-2 (11-7, 6-11, 12-10, 11-13, 12-10, 11-6) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित केले. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत मनिकाने मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळविले होते. तिची पुढील लढत जागतिक तिसऱ्या मानांकित चीनच्या यिदी वांग हिच्याशी होईल. मिश्र व महिला सांघिकमध्ये मनिकाला पदक मिळविण्यात अपयश आले असल्याने पदक मिळविण्याची तिला ही शेवटची संधी आहे.
पुरुषांच्या शेवटच्या सोळा फेरीत मानव विकास ठक्कर, मानुश उत्पलभाई शहा यांनी आयझॅक क्वेक याँग व यू एन कोएन पांग यांच्यावर 3-2 अशी मात केली. त्यांची पुढील लढत कोरियाच्या वुजिन जँग व लिम जाँग हून यांच्याशी होईल. शरथ कमल व साथियान यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान मात्र संपुष्टात आले. चीनच्या चुकिन वांग व फॅन झेनडाँग यांनी त्यांच्यावर 3-0 अशी एकतर्फी मात केली.
डेव्हिड बेकहॅम, इसो अपयशी
पुरुषांच्या ट्रॅक सायकलिंग कायरिनची अंतिम फेरी गाठण्यात भारताच्या डेव्हिड बेकहॅम व इसो यांना अपयश आले. उपांत्य फेरीच्या हीट एकमध्ये भारतीय जोडीला शेवटचे सहावे स्थान मिळाले. बेकहॅमने +0.922 गुणासह पाचवे स्थान मिळविले तर इसोने +2.980 गुण घेत सहावे स्थान मिळविले. त्याला पंचांनी समजही दिली होती. या दोघांना रिपेचेज फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.
रेस वॉकर्सनाही अपयश
अॅथलेटिक्समध्ये भारताची निराशाजनक सुरुवात झाली. विकास सिंग, संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी यांना अनुक्रमे पुरुषांच्या व महिलांच्या 20 किमी चालण्याच्या शर्यतीत पदक मिळविता आले नाही. पुरुषांच्या 20 किमी चालण्याच्या शर्यतीत विकासने 11 मध्ये पाचवे स्थान मिळविताना 1:27.33 वेळ नोंदवली तर संदीपला अपात्र ठरविण्यात आले. या प्रकारातील सुवर्ण व रौप्य चीनने पटकावले तर जपानला कांस्य मिळाले. महिलांच्या 20 किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांकाने पाचवे स्थान मिळविले. तिने 1:43.07 वेळ नोंदवली. सुवर्ण व रौप्य चीनला तर जपानला कांस्यपदक मिळाले.
महिला हँडबॉलमध्ये भारताचा पराभव
महिलांच्या हँडबॉलमध्ये भारताला चीनकडून 30-37 असा पराभव स्वीकारावा लागला. गट ब मधील या सामन्यात चीनने मध्यंतराला 18-12 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात त्यांनी त्यात आणखी 19 गुणांची भर घातली तर भारताने 18 गुण नोंदवले. गट ब मध्ये चीनने अव्वल स्थान मिळविले असून भारताला पहिल्या लढतीत जपानकडून पराभव स्वीकारावा लागला होता तर हाँगकाँगला बरोबरीत रोखले. चीनने हाँगकाँग व नेपाळ यांच्यावर विजय मिळविले होते.