दोन विद्यार्थ्यांच्या हत्येविरोधात जमाव रस्त्यावर : तपासासाठी सीबीआयचे पथक दाखल
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील वातावरण पुन्हा एकदा तणावग्रस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात घडलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या हत्येची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत. इंफाळमधील मुख्यमंत्री सचिवालयापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या मोइरांगखोम येथे दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान, मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक बुधवार, 27 सप्टेंबर रोजी विशेष विमानाने इंफाळला पोहोचले. या टीमचे नेतृत्व एजन्सीचे विशेष संचालक अजय भटनागर करत आहेत.
जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या दोन तऊणांच्या अपहरण आणि हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थी सहभागी झाले होते. बेपत्ता तऊणाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘वुई वॉन्ट जस्टिस’च्या घोषणा देत विद्यार्थी मुख्यमंत्री बिरेन एन सिंह यांच्या निवासाकडे जात होते. या जमावाला अटकाव करताना सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी
रॅलीचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते लांथेंगबा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या दोन तऊणांची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. “दोन्ही तऊणांच्या मारेकऱ्यांना 24 तासांच्या आत अटक करावी आणि त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणावेत, अशी आमची मागणी आहे,” असे ते म्हणाले. तर आम्हाला आमच्या तक्रारींबाबत मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे. आमच्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची निर्घृण हत्या केली जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमचा अभ्यास कसा सुरू ठेवणार?, असा प्रश्न विद्यार्थी गटाचे नेतृत्त्व करणाऱ्या युवकाने उपस्थित केला आहे.
दगडफेकीनंतर वाढला तणाव
विद्यार्थ्यांचा राग शांत करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींना मुख्यमंत्री आणि राज्यपाल या दोघांनाही भेटण्याची परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली. याचदरम्यान, काही विद्यार्थ्यांनी दगडफेक सुरू केल्याने परिस्थिती अचानक बिघडली. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्या. यापूर्वी, मंगळवार 26 सप्टेंबर रोजी आरएएफचे जवान आणि स्थानिक लोकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये 45 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.