केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय : व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यालाही अटक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली, इंफाळ
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्यादरम्यान दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने सीबीआयकडे सोपवले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे देशभरात संताप पसरल्यामुळे सुयोग्य तपास होण्यासाठी हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सुनावणी राज्याबाहेर चालवण्यासंदर्भात केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचेही समजते. मणिपूरमधील महिलांचा व्हायरल व्हिडिओ ज्या मोबाईलवरून शूट करण्यात आला होता, तो फोन जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय, व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुऊवारी देण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून अजूनही बरेच संशयित रडारवर आहेत. विविध तपास पथकांकडून संशयितांचा शोध जारी असून अनेकजण भूमिगत झाले आहेत. सर्व संशयितांचा शोध घेऊन त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेसंबंधी कठोर ताशेरे ओढले आहेत. सरकारला आम्ही आणखी थोडा कालावधी देत आहोत. त्यात जर कठोर करवाई करण्यात आली नाही, तर मात्र आम्हाला आमच्या पद्धतीने ती करावी लागेल, असा स्पष्ट इशारा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्व संबंधितांना दिला होता. विविध राजकीय पक्षांचे नेते, सेलिब्रिटी, कायदेतज्ञ, महिला आयोग यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांनीही या घटनेबाबत तीव्र शब्दात चीड आणि संताप व्यक्त केला असून संबंधितांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मैतेई समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार उसळला होता. याचदरम्यान 4 मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाल्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटले होते. कुकी आणि मैतेई समुदायांमधील वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायाच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. मणिपूरमध्ये सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान मोदी दररोज गृहमंत्र्यांच्या माध्यमातून मणिपूरची माहिती घेत आहेत.