काँग्रेस जिल्हा पदाधिकारी महेश (बाळू) अंधारी यांचे मालवण पालिका प्रशासनास निवेदन ; त्वरित स्ट्रीट लाईट चालू करण्याची मागणी
मालवण : प्रतिनिधी
मालवण शहरातील अनेक मार्गांवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. तसेच काही मार्गांवर दिवसा स्ट्रीट लाईट चालू आणि रात्री बंद अशीही स्थिती आहे.मालवणची ओळख पर्यटन केंद्र म्हणून आहे. याचा विचार करता तसेच आगामी सण उत्सव, सर्वच मार्गांवर वाढणारी गर्दी या सर्वांचा विचार करता मालवण मार्गांवरील स्ट्रीट लाईट चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र अनेक स्ट्रीट लाईट बंद आहेत.
मालवण शहर मुख्य रहदारी मार्गांवर रात्री पाहणी सर्व्हे केला असता अनेक स्ट्रीट लाईट बंद स्थितीत दिसून आल्या या सर्वांचे वीज खांब नंबर काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष महेश (बाळू) अंधारी यांनी निवेदन माध्यमातून मालवण पालिका मुख्याधिकारी यांना सादर केले असून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे. दरम्यान हायमास्ट व स्ट्रीट लाईट दुरुस्ती कामे सुरु आहेत. बंद स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु केल्या जातील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी लायन्स क्लब मालवण अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, सरदार ताजर, गणेश पाडगावकर उपस्थित होते.