नौदलाचा ऐतिहासिक निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाने महिलांसाठी स्वतःच्या विशेष कमांडो फोर्सचे (मार्कोस) दार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सैन्य, नौदल आणि वायुदलातील निवडक सैनिकांना सामील करत स्पेशल फोर्स तयार केली जाते. यातील सैनिकांना अत्यंत कठिण प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. हे कमांडो धोकादायक भागांमध्ये जलदपणे मोहीम राबवत शत्रूला सर्वप्रकारे प्रत्युत्तर देण्यास सक्षम असतात. मार्कोस कमांडो फोर्समध्ये आतापर्यंत केवळ पुरुषच सामील होत राहिले आहेत, याचमुळे नौदलाचा हा निर्णय ऐतिहासिक आहे.
नौदलात महिला सैनिकांनी सर्व आवश्यक निकषांची पूर्तता केल्यास त्यांना सागरी कमांडो (मार्कोस) होता येणार आहे. कुणालाही थेट स्पेशल फोर्स युनिटमध्ये दाखल केले जात नाही. सैनिकांना यासाठी स्वतःचे नाव पाठवावे लागते, मार्कोसला अनेक धोकदायक मोहिमांची पूर्तता करण्याकरता कठोर प्रशिक्षण दिले जाते. समुद्र, आकाश आणि जमिनीवरील सर्वप्रकारच्या मोहिमेला पूर्ण करण्याचे काम हे कमांडो करू शकतात. शत्रूच्या युद्धनौका, सागरकिनारी भागातील सर्वप्रकारच्या स्थितीत युद्ध लढू शकतात. समुद्रातही दहशतवाद्यांशी ते मुकाबला करू शकतात.
स्वेच्छेने मार्कोस होण्याचा पर्याय महिला अधिकारी आणि नौसैनिकांना उपलब्ध असणार आहे. महिला नौसैनिक पुढील वर्षी अग्निवीरच्या स्वरुपात सेवेत सामील होतील. नौदल ओडिशात आयएनएस चिल्का प्रशिक्षण केंद्रात महिलांसह अग्निवीरांच्या स्वतःच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देत आहे. नौदलाच्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत 341 महिलांसह 3 हजार प्रशिक्षणार्थी आहेत.