सेन्सेक्स 263 तर निफ्टी 98 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात भारतीय भांडवली बाजारात अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह यांच्याकडून व्याजदर वाढविण्याचा निर्णय होण्याअगोदरच जागतिक पातळीवर बुधवारी मिळताजुळता कल राहिल्याच्या दरम्यान भारतीय बाजारावर मात्र चिंतेचे ढग राहिल्याने बाजार घसरणीसह बंद झाला आहे.
बीएसई सेन्सेक्स दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर 262.96 अंकांसह 0.44 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 59,456.78 वर बंद झाला आहे. दिवसभरात काहीवेळ सेन्सेक्स 444.34 अंकांनी प्रभावीत झाला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 97.90 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,718.35 वर बंद झाल्याचे दिसून आले.
सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिड कॉर्प, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, एचसीएल टेक , डॉ.रेड्डीज लॅब, टीसीएस आणि भारती एअरटेल यांचे समभाग नुकसानीत राहिले. तर अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि नेस्ले यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील स्थिती पाहिल्यास यामध्ये आशियातील दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरणीत राहिले होते. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 2.38 टक्क्यांनी वधारुन 92.78 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. यावेळी शेअर बाजाराला दिलेल्या आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून मंगळवारी 1,196.19 कोटी रुपयाच्या समभागांची खरेदी झाल्याची माहिती आहे. अमेरिकेतील फेडरल बँकेकडून 0.75 टक्के दरात वाढीची चिन्हे असून त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. बुधवारी एफएमसीजी क्षेत्राच्या निर्देशांकाने 1.2 टक्के तेजी दाखवली होती. फार्मा, धातू या निर्देशांकांनीही बाजाराला आधार दिला.