100 अपत्यांचा पिता होण्याची इच्छा
युगांडाच्या एका उद्योजकाने एकाच दिवसात 7 युवतींसोबत एकत्रितपणे विवाह केला आहे. या उद्योजकाचे नाव हबीब एनसिकोकने असून तो 43 वर्षांचा आहे. तो एक प्रसिद्ध पारंपरिक हीलर आहे. हबीबने प्रत्येक युवतीला ‘आय डू’ म्हटल्यावर एक भव्य स्वागत सोहळा आयोजित केला, याची भव्यता पाहून प्रत्येक जण चकित झाला.
हबीबने स्वत:च्या प्रत्येक पत्नीला नवी कार दिली आहे. तसेच स्वत:च्या सासूसासऱ्यांनाही अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. हबीबच्या या पत्नींमध्ये दोन सख्ख्या बहिणी आहेत, त्याने त्यांच्या पालकांनाही दुचाकी वाहने दिली आहेत. हा हबीबचा पहिला विवाह नाही. याव्यतिरिक्त त्याला एक पत्नी असून तिचे नाव मुसान्युसा आहे.
हबीबच्या विवाहानंतरचा स्वागत सोहळा अत्यंत भव्य होता. वधू 40 लिमो आणि 30 मोटरसायकल्सच्या ताफ्यासोबत स्टायलिश पद्धतीने तेथे पोहोचल्या. हा प्रकार खरोखरच घडत असल्याचा विश्वासच काही जणांना बसत नव्हता. अशाप्रकारचा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. या रिसेप्शननंतर हबीब स्वत:च्या 7 पत्नींसोबत वाहनांच्या एका मोठ्या ताफ्यासह घरी पोहोचला.
माझ्या पत्नी परस्परांचा द्वेष करत नाहीत. एक आनंदी परिवार ठरावा म्हणून एकाचवेळी सर्वांशी विवाह केला. आणखी काही विवाह करण्याची माझी योजना असून याद्वारे 100 अपत्यांचा पिता होण्याचे माझे स्वप्न पूर्ण करणार आहे. माझ्या कुटुंबात अत्यंत कमी लोक आहेत, याचमुळे मी अनेक मुलांना जन्माला घालू इच्छितो, जेणेकरून माझे कुटुंब मोठे होऊ शकेल असे हबीबने म्हटले आहे. युगांडात बहुविवाह बेकायदेशीर आहे, परंतु आमच्या कुटुंबात हा प्रकार सामान्य आहे. माझ्या आजोबांना 6 पत्नी होत्या, ज्या एकाच घरात वेगवेगळ्या राहत होत्या. माझ्या वडिलांना 5 पत्नी होत्या असे हबीबने सांगितले आहे. हबीबने युगांडात एकाच दिवसात सर्वाधिक युवतींसोबत विवाह करण्याचा विक्रम मोडला आहे.